सकाळ इम्पॅक्ट : खेळाचे बनावट प्रमाणपत्र मिळविणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; मुंबईतील स्पर्धेचे प्रमाणपत्र

Crime against three for obtaining fake sports certificate
Crime against three for obtaining fake sports certificate

नागपूर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी न होता बनावट प्रमाणपत्र मिळविणाऱ्या तीन बोगस खेळाडूंविरुद्ध मानकापूर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. दै. ‘सकाळ’ने या प्रकरणी बुधवारच्या अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

‘सकाळ’ने राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी लाटल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या बोगस खेळाडूंमध्ये नागपूरच्या अनेक खेळाडूंचा समावेश असल्याचे उघडकीस आणले होते.

त्यांच्याविरुद्ध उपसंचालक अविनाश पुंड यांनी काही दिवसांपूर्वी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनी चौकशी करून संजय सावंत (रा. एसआरपीएफ कॅम्प, नागपूर), पवन पाटील (रा. नागपूर) आणि निखिल माळी ( रा. गोडुली, जि. सातारा) या तीन आरोपींविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला.

तिघांनी ट्रॅंपोलिन (जिम्नॅस्टिक्स) या खेळाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केली. पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांनी आरोपींविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, हे उल्लेखनीय. आरोपींनी नोव्हेंबर २०११ मध्ये मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे बनावट प्रमाणपत्र बनविले होते. वास्तविक त्यावेळी अशी कोणतीच स्पर्धा मुंबईत आयोजित करण्यात आली नव्हती.

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न होता भरमसाठ पैसे देऊन बोगस प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी लाटण्याचे अनेक प्रकार राज्यातील विविध विभागांमध्ये उघडकीस येत आहेत. महाराष्ट्रातच बोगस प्रमाणपत्र विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर जवळपास ४० बोगस खेळाडूंनी पोलिस विभागासह विविध शासकीय सेवेत नोकरी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचे व कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. या बोगस खेळाडूंकडून एका प्रमाणपत्रासाठी तीन ते साडे तीन लाख रुपये घेण्यात आल्याचे समजते.

जवळपास २५८ प्रमाणपत्रधारक बनावट

यासंदर्भात क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब मान्य करीत हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. ट्रॅंपोलिन खेळात जवळपास २५८ प्रमाणपत्रधारक बनावट आढळून आल्याचे सांगून, इतरही खेळांमध्ये अशी फसवणूक करणारे असू शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली होती.

प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी

राज्यात सर्वाधिक बोगस प्रमाणपत्रधारक खेळाडू औरंगाबाद विभागात आढळून आले आहेत. नागपूर विभागात असे २१ बोगस प्रमाणपत्रधारक मिळाल्याची माहिती आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील पदकविजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण आहे. याचा गैरफायदा घेत अनेकांनी शासकीय सेवेत नोकऱ्या लाटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com