परतीचा पाऊस शेतकऱ्यांना रडवतोय, काढलेली पिके शेतातच सडली

crop damaged due to heavy rain in narkhed of nagpur
crop damaged due to heavy rain in narkhed of nagpur

नरखेड (जि. नागपूर): तालुक्यात कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद या पिकाचे, तर संत्रा व मोसंबी या फळाबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कापसाला देखील परतीच्या पावसाच्या फटका बसला आहे. ऐन पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नरखेड तालुक्यात यंदा पावसाळ्यात पावसाने उशिरा आगमन केले. त्याचबरोबर यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात पण अंतराने पडला. आधीच्या पावसाने पिकाचे नुकसान होऊन सोयाबीनचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या आठवड्यात मुसळधार परतीचा पाऊस झाला. सध्या सुरू असलेला परतीचा पाऊस खरिपातील पिकासाठी पोषक नव्हे तर मारक ठरत आहे. 

परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कापसाची बोंडे काळी पडत आहे. आधीच या पावसामुळे कापसाचा दर्जा घसरला असताना पुन्हा या पावसामुळे कापसाचे नुकसान होत आहे. त्यामुळे हा कापूस शेतकर्‍यांना मातीमोल भावात विक्री करावा लागणार आहे. त्यामुळे बाजारभावात नुकसान सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. 

सोयाबीनचे देखील उत्पन्न होईल, असे वाटत नाही. पण, त्याची कापणी करून जनावरांना चारा होईल, या आशेने शेतकऱ्याने कापणी केली. मात्र, परतीच्या पावसाने ते सोयाबीन देखील भिजले आहे. गेल्या सहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कापणीचा खर्चही शेतकऱ्यांवर बसणार आहे. 

नरखेड तालुक्यात कपाशी हे मुख्य पीक असल्याने परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे कपाशीला लागलेली बोंडे झडत आहे. काही ठिकाणी बोंडे फुटून त्यावरील कापूस भिजल्याने कपाशीचेही नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सध्या सुरू असलेला पाऊस धोकादायक आहे. त्यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचू न देता त्याचा निचरा लागलीच होणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले. 

खरिपांच्या काढणीबरोबर काही शेतकरी रब्बीच्या हंगामाच्या मशागतीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, पावसामुळे मशागतीमध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांची पेरणी लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. 

नरखेड तालुक्यात खरिपाचा पेरा ४७ हजार हेक्‍टरवर झाला आहे. मात्र, पावसामुळे व विविध रोगांमुळे १३ हजार हेक्‍टरवरील सोयाबीन पिकांचे ८० ते १०० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. उडीद, मूग हातचा गेला आहे. कपाशीला चांगली बोंडे फुटली आहे. मात्र, अति पावसाने बोंडे सडत आहे. या परिस्थितीत कपाशीचे उत्पादन अधिक येण्याची शक्‍यता कमीच आहे. बोंडे सडू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी उपाय योजना केल्यातरच कपाशीचे पिके टिकतील असे आवाहन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com