कटिंग झाली दादा, आता "शेविंग'चे पुढे बघू; पोटापाण्याचा प्रश्‍न तर मिटला...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सलून दुकानांना दाढी वगळता फक्त कटिंग करण्याच्या अटींसह दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. लॉकडाउनच्या काळात दुकान संचालकासह कारागिरांचे उत्पन्न ठप्प पडलेले होते.

टेकाडी (जि.नागपूर):  हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताने कैची चालेल तेव्हाच कुटुंबाचा गाढा ओढता येणार असलेल्या सलून चालकांनी शरते शेवटी आज सुटकेचा श्वास घेतला. कोरोना संकटकाळात अनेक व्यवसायांना परवानगी मिळाली होती. परंतु, गेली तीन महिने सलून चालकांची कैची थांबलेली होती. अशात मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर कोरोना गाइडलाइनचे पालन करत सलून दुकाने "अनलॉक' करण्याचे आदेश देण्यात आले. क्षेत्रातील सलून दुकाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करत दुकानदारांनी उघडली होती.

अधिक वाचा : धक्‍कादायक ! कोरोनाबाधित रूग्णाच्या जेवणात आढळल्या अळया

कोरोना गाइडलाइनचे पालन
ग्रामीण भाग असलेला पारशिवनी तालुक्‍यांतर्गत अनेक ठिकाणी रविवारी सलून दुकाने उघडलेली होती. बऱ्याच ठिकाणी सलून चालकांची दुकाने ही भाड्याच्या खोलीत असल्याने खोलीचा किराया हा सर्वांत मोठा प्रश्न संचारबंदीत दुकानदारांसमोर होता. गेली तीन महिने अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, सलून दुकानांकडे संसर्गाच्या भीतीपोटी शासनाने दुर्लक्ष केले होते. नाभिक एकता मंचद्वारे तालुक्‍यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा पवित्रा घेतले होता.

अधिक वाचा : "वाकाटकां'च्या राजधानीलाही बाधा, नगरधनमध्ये पसरली दहशत.

तीन महिन्यांनंतर सलून दुकाने "अनलॉक'
गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद अध्यक्षा रश्‍मी बर्वे यांच्या मार्गदर्शनात नाभिक एकता मंचाच्या सदस्यांनी मंत्री सुनील केदारे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. केदार यांनी लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सलून दुकानांना दाढी वगळता फक्त कटिंग करण्याच्या अटींसह दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. लॉकडाउनच्या काळात दुकान संचालकासह कारागिरांचे उत्पन्न ठप्प पडलेले होते. अनेकांनी उदरनिर्वाहासाठी वेगळी वाट निवडलेली होती. पारंपरिक व्यवसाय वगळून दुसरा व्यवसाय करणे अनेकांना उमजत नव्हते. त्यामुळे दुकाने कधी उघडतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर जूनपासून केवळ कटिंगसाठी का होईना, दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह दुकाने निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. दुकाने सुरू झालीत. आता कोरोना प्रतिबंधात्मक उपायाची अंमलबजावणीसुद्धा दुकानदार करतील आशा बळावलेली आहे.

हेही वाचा : टमाटर झाले शंभर रूपयांत "लालीलाल'; असे काय झाले...

आर्थिक कोंडी सुटेल
राज्य शासनाने दुकाने सुरू करण्याच्या आदेशाचे मनापासून स्वागत करत कोरोनासंदर्भात असलेले नियम पाळूनच दुकानात कटिंग सुरू राहणार आहे. सध्या गर्दी होणार नाही याची दक्षता घेत फक्त गावातील स्थानिक ग्राहकांचेच वेळ देऊनच केस कापल्या जात आहे. दाढीसाठी ग्राहक आग्रह करतील तरी नकार देत आहोत. दुकाने सुरळीत सुरू झाल्याने थोड्या प्रमाणात आमची आर्थिक कोंडी सुटेल.
लक्ष्मण पारधी
सलून दुकान संचालक, टेकाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cutting is done, now let's look at "shaving"; the problem of food is solved ...