VIDEO : हिंदूत्व कोणाची मक्तेदारी नाही, ते जगावं लागतंय, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

टीम ई सकाळ
Thursday, 4 February 2021

हिंदूत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होते. त्यालाच आज फडणवीसांनी नागपुरात प्रत्युत्तर दिले. 

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे होतात. ज्यावेळेस शिवगान स्पर्धा बंद होते, अजान स्पर्धा सुरू होते, तेव्हा हे बोलावं लागते. हिंदूत्व त्यांनी का सोडले हे त्यांनी सांगावे. हिंदूत्व कोणाची मक्तेदारी नाही, ते जगावं लागतंय, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. हिंदूत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होते. त्यालाच आज फडणवीसांनी नागपुरात प्रत्युत्तर दिले. 

हेही वाचा - वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप

आम्ही आंदोलन केले तेव्हा एल्गार प्रकरणात सरकारने थातुरमातुर कारवाई केली. राम मंदिरासाठी निधी गोळा केला जातोय त्यावर सामनामध्ये लेख लिहायला शिवसेनेकडे वेळ आहे. मात्र, शेरजिल उस्मानीवर लिहावं इतका वेळ त्यांच्याकडे नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला. 

नेत्यांच्या आशीर्वादाने दारूविक्री -
राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा टॅक्स कमी केला होता. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी कमी झाले होते. आता राज्य सरकारने टॅक्स कमी करावे. त्यासाठी शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौंटकी करू नये, असेही फडणवीस म्हणाले. राज्यात सर्रास अवैध धंदे चालले आहेत. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात नेत्यांच्या आशिर्वादाने सर्रास दारू विक्री केली जाते, असाही आरोप त्यांनी केला. 

हेही वाचा - सात महिलांनी नाकारले चक्क सरपंच पद, 'बाळू'साठी धरला हट्ट

शेतकरी आंदोलनावर टीका -
भारताला बदनाम करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन चालले आहे. काल डिलीट केलेल्या ट्विटमुळे हे लक्षात आलेय. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय लोक भारताला बदनाम करत आहे, याचे वास्तव समजले आहे, असे फडणवीस म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis replied to cm uddhav thackeray hindutva statement