
कमीत कमी मेमरी साईज लागत असल्याने या प्रतीला इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड आणि डाउनलोड करायला कमी वेळ खर्च होईल. याचा फायदा साहित्यिक, अभ्यासक, संशोधक तसेच सर्वसामान्यांना घरपोच होईल.
नागपूर : आजच्या डीजिटलच्या युगात साऱ्यांचा भर ऑनलाईनवर आहे. वारकरी संप्रदायाची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. त्यापाठोपाठ आपल्या पुरातन हस्तलिखितांना डीजिटल पद्धतीने जतन करण्याची योजना इलेक्टॉनिक्स इंजिनिअर प्रा. उमेश आकरे यांनी आखली आहे. डॉ. आकरे यांनी महानुभाव पंथातील पोथ्यांचे हुबेहूब डीजिटल स्वरूपात जतन करता येईल असे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या माध्यमातून येणाऱ्या पिढीला हजारो वर्षांपूर्वीच्या पोथ्यांचा लाभ घेता येईल.
जगभरातील धार्मिक स्थळ, मठ मंदिर आश्रमातून तसेच देशात विखुरलेल्या प्रत्येक विद्यापीठाच्या संग्रहालयात हस्तलिखिते बहुसंख्येने पाहायला मिळतात. या हस्तलिखितातून भाषा कला विज्ञान तत्कालीन इतिहास आणि अध्यात्मिक ज्ञान अभ्यासायला मिळते. परंतु, पुरातन काही हस्तलिखिते इतकी जीर्ण आहेत की त्यांना स्पर्श केला की त्याचा भुगा होतो. कागद अती जीर्ण झाल्याने तो फाटतो. अशावेळी हस्तलिखित कसे सांभाळायचे हा मोठा प्रश्न आहे.
हीच बाब लक्षात घेऊन प्राध्यापक उमेश आकरे यांनी मराठीतून लिहिल्या गेलेल्या अमरावती येथील जगद्गुरु श्री नागदेवाचार्य आश्रम येथे संग्रहित असलेल्या एका पोथीतील पानांचे स्कॅन करून छायाचित्र घेतले. त्याचे आहे तसे यथातथ्य संवर्धन केले.
यासाठी त्यांनी संबंधित तांत्रिक माध्यमे आणि प्रगत साधनसामग्री विचारपूर्वक योजून त्याची जास्तीत जास्त मेमरी साईजने आकुंचित असलेली तरीही मूळ प्रतीचे सर्व गुणधर्म जैसे थे संरक्षित करून संक्षिप्त रूप निर्माण करण्याचे ठरविले. या छायाचित्रांचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांनी पृथक्करण केले. सरतेशेवटी ही सारी वेगवेगळी संक्षिप्त रूपे एकत्रित करून पुन्हा एकदा समग्र छायाचित्र बनवले.
सविस्तर वाचा - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव
या यशामुळे संगणकामध्ये अशी बरीच हस्तलिखिते संग्रहित करण्याची व्याप्ती वाढली. कमीत कमी मेमरी साईज लागत असल्याने या प्रतीला इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड आणि डाउनलोड करायला कमी वेळ खर्च होईल. याचा फायदा साहित्यिक, अभ्यासक, संशोधक तसेच सर्वसामान्यांना घरपोच होईल.
हे संशोधन आचार्य पदवीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रबंध रूपाने सादर करण्यात आले. प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संशोधन केंद्रावर झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र बावणे यांच्या मार्गदर्शनात प्रा. आकरे यांनी हे संशोधन पूर्ण केले.
ज्ञान संग्रह परोपरीने सांभाळावा
ज्ञानाचा हा ठेवा मराठी भाषिकांचा पुढे या प्रयत्नातून पोहोचवला जावा या उद्देशाने समाज, शासन, धार्मिक संस्था, विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांनी हा वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या संशोधनामुळे हस्तलिखितांचे संवर्धन आणि संरक्षण शक्य होईल. सर्वांनी पूर्वजांचा हा ज्ञान संग्रह परोपरीने सांभाळावा आणि त्या ज्ञानाचे भांडार पुढील पिढीला उपलब्ध करून द्यावे.
- प्रा. उमेश आकरे
संपादन - नीलेश डाखोरे