कृषी कायद्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, सभागृहात एकच गोंधळ

नीलेश डोये
Saturday, 23 January 2021

सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेस सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या या तिन्ही काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी हे आज गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत.

नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सभेतही उमटले असून कायदे कोणाच्या हिताचे यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. त्यामुळे सभागृहात काहीकाळ यावरून चांगलाच गोंधळ उडाला होता. 

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेस सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या या तिन्ही काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी हे आज गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानेही तात्पुरती स्थगिती दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही या कायद्यांना स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही या कायद्याविरोधात ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला. त्यावर विरोधी पक्ष नेते अनिल निधान म्हणाले की, तीनही कायदे शेतकरी हिताचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची होत असलेल्या दुरवस्थेचा पाढाच त्यांनी वाचून दाखविला. या कायद्यामुळे दलाली बंद होणार आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून दलालांसाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना दलाल म्हणणाऱ्यांचा निषेध असल्याचे लेकुरवाळे म्हणाल्या. उपाध्यक्ष कुंभारे म्हणाले की, हे कायदे शेतकरी हितार्थ नसून ते अदानी, अंबानीच्या हिताचे आहेत. कृषी कायद्यावर विरोधकांना चर्चा अयोग्य वाटत असेल, तर आज देशभरात पेट्रोल-डिझेलचेही दर कधी न इतके वाढले आहेत. त्यावरही चर्चा व्हायला हवी, असा प्रश्न उपस्थित केला. 

हेही वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

चौकशी समिती बोगस - हरडे 
शिक्षण विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात मोठा भ्रष्टाचार झाला. याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. ज्या विभागावर आरोप आहे, त्याचे विभाग प्रमुख चौकशी समितीवर घेण्यात आले. आरोप करणाऱ्या सदस्याची साक्ष नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे चौकशी समितीच बोगस असल्याचा आरोप राजेंद्र हरडे यांनी केला. 

हेही वाचा - भरझोपेत होता काका, अर्ध्यारात्री घरात शिरला पुतण्या अन् सर्वच संपल; पाचपावलीतील थरार

जिल्ह्याची 'हद्द' ओलांडू नका - कोल्हे 
सर्व सदस्यांनी देशाच्या राजकारणावर बोलण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या राजकारणावर चर्चा करावी. नागपूरची हद्द ओलांडून न बोलता आपआपल्याला मतदार संघातील समस्या येथे मांडाव्यात. जिल्ह्याची 'हद्द' ओलांडू नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे गट नेते चंद्रशेखर कोल्हे यांनी दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute over agriculture act in nagpur zilla parishad meeting