निधीचे वाटप समप्रमाणात करा जिल्हा परिषद सदस्यांची सीईओंना मागणी

नीलेश डोये
Wednesday, 14 October 2020

प्रत्येक सदस्याच्या वाट्याला ६ लाख २० हजार रुपयांचा निधी येतो. असे असताना सदस्यांना ४ लाखांचेच काम प्रस्तावित करण्यास सांगण्यात येत असल्याने सदस्यांकडून आक्षेप घेण्यात येत आहे.

नागपूर : यंदा जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगाचा १० टक्के निधी मिळाला आहे. हा निधी सर्व सदस्यांना विकास कामासाठी समप्रमाणात वाटप करण्यात यावा, अशी मागणी जि.प. सदस्य राजेंद्र हरडे यांनी सीईओंना केली आहे.

जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगाचा दोन्ही टप्प्यातील ७ कोटी २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यातील निधीतून जि.प. सदस्यांना ४ लाख रुपयांचे कामे प्रस्तावित करण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांकडून फोनवरून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला ३ कोटी ६० लाख मिळाले आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्याच्या वाट्याला ६ लाख २० हजार रुपयांचा निधी येतो. असे असताना सदस्यांना ४ लाखांचेच काम प्रस्तावित करण्यास सांगण्यात येत असल्याने सदस्यांकडून आक्षेप घेण्यात येत आहे.

पूर पाच तालुक्यांत, रस्त्यांचे नुकसान १३ तालुक्यांत;  बांधकाम विभागाचा पुरात हात धुण्याचा प्रयत्न

उर्वरित १ लाख २० हजार रुपयांच्या निधीचे काय नियोजन करणार आहे. याची माहिती दिलेली नाही. कोरोनामुळे विकास कामांवर लगाम लागली आहे. शासनाने विकास कामासाठीचा निधीच उपलब्ध करून दिला नाही. सदस्यांना वेगळा फंड नाही. १५ व्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी सदस्यांना समप्रमाणात वाटून दिल्यास सदस्यांना आपल्या स्तरावर विकास कामे करता येईल. त्यामुळे संपूर्ण निधी समप्रमाणात वाटून द्यावा, अशी मागणी हरडे यांनी केली आहे.

तर न्यायालयात जाणार
काही जिल्हा परिषदेमध्ये असाच प्रकार झाला. हा प्रकार शासनाच्या आदेशाच्या विरोधात आहे. सदस्यांच्या हिश्शातील निधीचे काय होणार, हेही सांगण्यात आले नाही. हा प्रकार मान्य नसून याच्या विरोधात प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribute funds equally Zilla Parishad members demand CEO