यंदा शासकीय डॉक्टरांची दिवाळी रुग्णांसोबतच, उन्हाळ्यापाठोपाठ दिवाळी सुट्ट्याही रद्द

केवल जीवनतारे
Thursday, 29 October 2020

उन्हाळी सुट्ट्यांच्या दोन महिन्यांच्या काळात एक लाख रुग्णांना तपासण्याचे काम ५० टक्के डॉक्‍टर करतात. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयात हीच स्थिती आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या. आता दिवाळी तोंडावर आली. दिवाळीतील सुट्ट्यांचा आनंद कुटुंबासोबत अनुभवता येईल, असे डॉक्टरांना वाटत असताना या सुट्ट्या आरोग्य विद्यापीठाने रद्द केल्या आहेत.

नागपूर : कोरोनाचा आणिबाणीचा काळ लक्षात घेता राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील कोविड बाह्यरुग्ण विभाग तसेच कोरोना वॉर्डात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या आहे. यामुळे डॉक्‍टरांच्या उन्हाळी सुट्यांपाठोपाठ आता दिवाळीच्या सट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून तसे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना कळवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा डॉक्टरांना रुग्णांसोबतच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

दरवर्षी, राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षकांच्या सुट्यांचे नियोजन करण्यासाठी 'फिप्टी-फिप्टी'चा फॉर्म्युला वापरला जातो. दोन टप्प्यात वैद्यकीय शिक्षकांना उन्हाळी सुट्टी देण्यात येते. पहिल्या टप्प्यात ५० टक्के डॉक्‍टरांना उन्हाळी सुट्टी देण्याचा प्रघात आहे. त्यानंतर उर्वरित ५० टक्के शिक्षक उन्हाळी रजेवर जातात. असा हा 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगापासून वाचवतो. राज्यभरातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला 40 हजार रुग्णांची तपासणी होते. वैद्यकीय शिक्षकांसह निवासी डॉक्‍टर ओपीडीत तपासणी करतात. कोरोना संकटामुळे अंतिम वर्षाच्या निवासी डॉक्‍टरांनाही सुट्टी देण्यात आली नाही. 

हेही वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का...

एकट्या मेडिकलचा विचार करता उन्हाळी सुट्ट्यांच्या दोन महिन्यांच्या काळात एक लाख रुग्णांना तपासण्याचे काम ५० टक्के डॉक्‍टर करतात. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयात हीच स्थिती आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या. आता दिवाळी तोंडावर आली. दिवाळीतील सुट्ट्यांचा आनंद कुटुंबासोबत अनुभवता येईल, असे डॉक्टरांना वाटत असताना या सुट्ट्या आरोग्य विद्यापीठाने रद्द केल्या आहेत. यामुळे नाराजीचा सूर आहे. 

हेही वाचा - दिवसा वनभ्रमंती, रात्रीला मचाणावर जागरण; तेव्हा कुठं पिंजऱ्यात अडकला वाघोबा

मेडिकल टिचर्सच्या समस्यांबाबत शासनाने विचार करावा -
कोरोनाच्या संकटामुळे मेडिकल टिचर्सच्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, कोणताही नाराजीचा सूर न काढता वैद्यकीय व्यवसायाचे ब्रीद सांभाळत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकल विभागात कार्यरत मेडिकल टिचर्स कोरोना वॉर्डात सेवा देत आहेत. याशिवाय अस्थायी असलेले ५८३ मेडिकल टिचर्सला शासनाने कायम करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या एनपीएच्या प्रश्न, सातव्या वेतनश्रेणीच्या विषयाबाबत शासनाचे धोरण उदासीन आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर बरे झालेले मेडिकल टिचर्स पुन्हा कामाला लागले. यामुळे या टिचर्सच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार शासनाने करावा. 

-डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र मेडिकल टिचर्स असोसिएशन, महाराष्ट्र. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali vacation of government doctors cancelled due to covid 19