संचार बंदीला घाबरू नका, निर्णय नागरिकांच्या हितासाठीच; गृहमंत्री अनिल देशमुखांचं प्रतिपादन   

राजेश चरपे
Friday, 25 December 2020

ख्रिस्मस व नवीन वर्षाच्या स्वागतकाळातच ही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. कोरोनाची तीव्रता कमी झालेली असली तर धोका मात्र टळलेला नाही.

नागपूर : खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकांच्या सुविधेसाठी आणि कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा - अटल बिहारी वाजपेयीनीं घेतला होता रामभाऊंच्या पाटोडीचा आस्वाद; नागपूरला अनेकदा दिली...

ख्रिस्मस व नवीन वर्षाच्या स्वागतकाळातच ही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. कोरोनाची तीव्रता कमी झालेली असली तर धोका मात्र टळलेला नाही. हे  नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. कोरोना योद्धा आणि जनतेच्या सहभागामुळे राज्यातील जनतेनी खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनावर मात केली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी कोरोनाच्या प्रसारासाठी कुठेही संधी मिळू नये, यासाठी या संचारबंदीचा फायदा होणार आहे. 

राज्य सरकारने रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राज्याच्या नागरिकांच्या हितासाठी व आरोग्यासाठी हितकारक असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय. रात्रीच्या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री सुरू राहणारे कार्यालये व प्रतिष्ठाने वगळता हॉटेल, पब, सिनेमागृहे रात्री ११ वाजता बंद करावी लागणार आहे. या संचारबंदीतून वैद्यकीय सेवा तसेच अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा - काउंट हॅक होण्याची भीती वाटतेय? 'या' आहेत स्मार्ट पासवर्ड तयार करण्याच्या टिप्स अँड ट्रिक्स 

या काळात मोटरसायकलवर एकटे किंवा दोघेजण प्रवास करू शकतील, चारचाकी वाहनेही चालविता येतील, परंतु या वाहनांमध्ये चारपेक्षा अधिक लोक राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. मॉर्निंग वॉक किंवा रात्री कामानिमित्त कुठे जायचे असल्यास त्यासाठी कोणतेही बंधने नसल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना काळात जनतेची सकारात्मक सहकार्य मिळालेले आहे. या पुढील काळातही हे सहकार्य मिळेल, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not panic about night curfew said home minister Anil Deshmukh