कुत्र्यांची वंशवेल वाढता वाढेच; नसबंदीवरील खर्च व्यर्थ गेला का?

राजेश प्रायकर
Tuesday, 1 December 2020

सबंदीनंतरही शहरातील श्वानांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नसबंदी यशस्वी होते की नागरिकांच्या समाधानासाठी ही रक्कम खर्च करण्यात येते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच चार वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ७५ हजार ५८७ जणांना चावा घेतला. अर्थात दररोज ५१ जणांना कुत्रा चावा घेत आहेत.

नागपूर : अनेक वर्षांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. नागरिकांना चावा घेण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. कुत्र्यांवर नियंत्रणासाठी केवळ नसबंदीचे कारण पुढे केले जाते. मात्र, गेल्या चार वर्षांत नसबंदीवर ९४ लाख रुपये खर्च केल्यानंतरही कुत्र्यांची वंशवेल वाढत आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारीनुसार दररोज ५१ लोकांना कुत्रे चावा घेत आहेत. सद्यःस्थितीतही मोकाट कुत्र्यांवरील महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नसून, कुत्र्यांच्या नसबंदीवरील खर्च व्यर्थ गेला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा कळप दिसून येत असून, वाहनधारकांसाठी नवे स्पीडब्रेकर तयार झाल्याचे चित्र आहे. नुकतेच हुडकेश्वर पोलिस स्टेशनअंतर्गत दुचाकीने भरधाव जात असताना अचानक रस्त्यावरील कुत्रा जोरात भुंकल्याने चावण्याच्या भीतीपोटी गाडीवरून थेट खाली उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे.

जाणून घ्या - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

कायद्यानुसार कुत्र्यांना पकडून बाहेर सोडता येत नसल्याने किंवा त्यांच्याविरुद्ध कुठलीही कडक कारवाई करणे शक्य नसल्याने महापालिकेने त्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नसबंदीचा उपाय शोधून काढला. २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षांत १८ हजार ६८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यासाठी महापालिकेने विविध संस्थांना ९४ लाख ८ हजार ९४ रुपये दिल्याचे माहिती अधिकारात महापालिकेने दिलेल्या माहितीतून पुढे आले.

परंतु, नसबंदीनंतरही शहरातील श्वानांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नसबंदी यशस्वी होते की नागरिकांच्या समाधानासाठी ही रक्कम खर्च करण्यात येते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच चार वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ७५ हजार ५८७ जणांना चावा घेतला. अर्थात दररोज ५१ जणांना कुत्रा चावा घेत आहेत. नसबंदीवर खर्च कशासाठी? केवळ काही संस्थांच्या घशात महापालिकेचा पैसा ओतण्यासाठीच नसबंदीचा फार्स केला जातो काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ. शीतल आमटेंचा जीवनप्रवास

प्रत्येक प्रभागात दोन हजारांवर मोकाट कुत्रे

महापालिकेने २०१७ मध्ये मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते. यात प्रत्येक प्रभागात २१३६ श्वान असल्याचे दिसून आले होते. या सर्वेक्षणानंतरही श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनेत महापालिका अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आजही शहरातील प्रत्येकच रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून, दुचाकीधारकांचे किरकोळ अपघात होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog sterilization money wasted