बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ. शीतल आमटेंचा जीवनप्रवास

टीम ई सकाळ
Monday, 30 November 2020

आमटे कुटुंबीयांनी गेल्या २४ नोव्हेंबरला एक पत्रक जारी करून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्याने सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

चंद्रपूर : आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. आमटे कुटुंबीयांनी गेल्या २४ नोव्हेंबरला एक पत्रक जारी करून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्याने सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

नागपूर शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण -
डॉ. शीतल आमटे या दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांची कन्या होत्या. डॉ. शीतल यांनी २००३ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतले. सोशल आंत्रप्रनरशिप हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी आजोबा बाबा आमटे, आईवडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचे ठरविले. त्यांनी हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचे वित्त नियोजन त्या करत होत्या. त्यांनी चाळिशीच्या आता अनेक कामे केली. त्यासाठी त्यांनी 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'ने मार्च २०१६ मध्ये 'यंग ग्लोबल लीडर' म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

बाबांचा वारसा -
पुढे अमेरिकेत जाऊन हावर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला होता. मेडिकल लीडरशिप क्षेत्रात 'लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी'सोबत 'मशाल' आणि 'चिराग' असे दोन कार्यक्रम सुरू केले होते. सेवा देत असतानाच त्यांनी सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन केले. अपंग, बेरोजगार तरुणांसाठी 'युवाग्राम' उपक्रम राबविला. आनंद अंध विद्यालय, आनंद मूकबधिर विद्यालय या शाळांचे डिजिटलायझेशन त्यांनी केले. त्या आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा सशक्तपणे पुढे चालवित होत्या. आनंदवनाला 'स्मार्ट व्हिलेज' बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे होणारे पलायन होणे त्यांनी थांबविले. 

हेही वाचा - ‘ई सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाल्या होत्या डॉ. शीतल आमटे, वाचा सविस्तर...

शीतल आमटेंचा वादग्रस्त व्हिडिओ -
महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी  काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. हा व्हिडिओ दोन तासांतच माध्यमावरून हटविण्यात आला होता.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या 'आनंदवन'मधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?​

आमटे कुटुंबीयांचे निवेदन -
शीतल आमटे करजगी यांनी व्हिडिओत केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले आहे. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचे या चौघांनी म्हटले होते. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला आहे. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली आहे.

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: profile of dr shital amte karajgi