"महादेवाचा नंदी आला, गोष्ट सांगतो खरीखुरी, हे गाणे म्हणणारा "नंदीवाला' पोटासाठी दारोदारी

चांपा ः नदी घेउन भर दुपारी उन्हात पोटापाण्यासाठी दारोदार भटकणारे नंदीवाले.
चांपा ः नदी घेउन भर दुपारी उन्हात पोटापाण्यासाठी दारोदार भटकणारे नंदीवाले.

चांपा (जि.नागपूर) : ऐन दुपारचे रणरणते उन्ह, खपाटी गेलेले पोट व त्याचबरोबर अंगातून निथळणारा घाम, कोरभर तुकडयासाठी नंदी घेउन वणवण भटकणारे पाय शेवटी सगळया गरजांची मैत्री झाल्यामुळे पोटापाण्यासाठी लॉकडाउनमध्येही "महादेवाची गाणी' गात फिरत आहे. त्याला अपेक्षा आहे, कुणीतरी त्याचा नंदीचा खेळ पहावा व पदरात दोन पैसे टाकून पोटापाण्याची सोय लावावी.

हेही वाचा : आता बोला...चक्‍क पोलिस कर्मचा-यालाच सायबर गुन्हेगाराने बनविले मामा

रंगणारा खेळ पडला ठप्प
जिल्ह्यातील सर्व लॉकडाउन व सीमा बंद असल्यामुळे दीड महिन्यांपासून नंदीच्या व्यवसाय बुडाला आहे. उपजीविका भागविण्याच्या प्रयत्न करीत नंदीवाले दारोदार भटकत आहेत. "सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय' हे गाणं महाराष्ट्राला सुपरिचित आहे. गाण्यातला भोलानाथ म्हणजेच नंदीवाल्यांचा नंदी. शिंगांना व पायात रंगीत सुती गोंडे बांधलेले, गळ्यात घंटांची माळ आणि पाठीवर रंगीबेरंगी व सुंदर नक्षीकाम केलेली शाल अशा सजवलेल्या वेशातला नंदी लक्ष वेधून घेतो. भविष्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवून देतो, हे चित्र आपण अनेकदा आपण अनुभवले आहे. असेच चित्र उमरेड तालुक्‍यांतील चांपा गावात पाहावयास मिळाले.

हेही वाचा  : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याचे "लर्न फ्राम होम'
 

अभावग्रस्त आयुष्य वाटयाला
नंदी शंकर महादेवाचा भक्त व सेवक असल्याची भावना असल्यामुळे लोकांच्या मनात नंदीवर श्रद्धा व त्याच्या भविष्यकथनाबद्दल आदर होता. याच श्रद्धा व आदरापोटी लोकांनी स्वखुशीने दिलेली दक्षिणा हेच नंदीवाल्या जमातींच्या उपजीविकेचे परंपरागत साधन होते. उपजीविकेचे साधन कमजोर झाले असून अभावग्रस्त आयुष्य जगावे लागत आहे. भटकेपणामुळे यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असले तरी नवीन पिढीतील त्यांची बरीच मुले-मुली शाळा शिकत आहेत. दिवाळी सण होताच नंदीवाले आपापला नंदी घेऊन खेळ दाखवायला राज्यात, राज्याबाहेरही जात असत. दिवाळीनंतर बाहेर पडल्यानंतर ते शिवरात्रीला परत येत होते. मात्र, सध्या राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रार्दुर्भावामुळे जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कुही फाटा येथील भटक्‍या समाजातील नंदीबैलाच्या खेळाचे आकर्षण घटले आहे.

हेही वाचा :  आनंदवार्ता, कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी तयार केले हे मॉडेल

भोलानाथचे भविष्य कुणीच ऐकत नाही
शिक्षणाच्या प्रचार व प्रसारामुळे वाढलेली विज्ञाननिष्ठा आणि आधुनिक काळात घराघरात पोहोचलेली करमणूक व्यवस्था यामुळे नंदीकडून भविष्य कोणी ऐकत नाही. त्यामुळे नंदीवाले समाजाचा भविष्य सांगण्याचा परंपरागत व्यवसाय लोप पावत आहे. गावकुसाबाहेर भटकंती करणारा हा समाज आता स्थिर होत आहे. शेती, शेतमजुरी करून उदरनिर्वाह केला जात आहे. मात्र, गावगाड्यातून आजही सोयी-सुविधा-सवलती व घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, अशी खंत कुही फाटा (ता. उमरेड) येथील सरोदी समाजातील नंदीवाले आदिवासी भटक्‍या वस्तीमधील नागरिकांनी व्यक्त केली. या ठिकाणी सुमारे 40 कुटुंबे गेल्या 40 वर्षांपासून राहत आहेत. मुख्यत: घरोघर फिरून छोटे छोटे कृत्रिम शोभिवंत दागिने, अशुभ किंवा वाईट गोष्टींपासून मुला-बाळांचे संरक्षण करणारे ताईत, बैलाच्या गळ्यात बांधण्यासाठी आवश्‍यक कवड्यांच्या आणि मोठ्या मण्यांच्या माळा, सुया-दाभण-बिब्बा, फणी-कंगवे-रिबिन आदी कटलरी वस्तू विक्रीचे काम आजही करतात.

आजही पक्‍के घर नाही
आमचा समाज साधारणतः1970 मध्ये नागपूर येथे आला. गावोगावी भटकंती करीत असताना कुहीफाटा येथे मूळ चाळीस कुटुंबे स्थिर झाली. मात्र, आजही कुटुंबांना राहायला पक्के घर नाही. लॉकडाऊनमुळे काहींना राशनकार्ड दिले, परंतु राशन दुकानातून अन्नधान्य मिळाले नाही. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. लॉकडाऊनमुळे आमच्या पारंपरिक व्यवसायावरही फटका बसला आहे. मात्र, महिला कटलरी व्यवसाय फिरून करतात, नंदीचा खेळ दाखवून आम्ही उदरनिर्वाह करीत आहोत.
रोहित महापूरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com