कोरोना लसीबाबत शंका आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी; जाणून घ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर

Doubts about the corona vaccine Know the answers to each question
Doubts about the corona vaccine Know the answers to each question

नागपूर : कोरोना विषाणू दिवसेंदिवस पाय पसरवत चालला आहे. याचा परिणाम देशावर होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याचा नागरिकांवर कोणताही परिणाम होत असल्याचे दिसून येत नाही आहे. वाढती रुग्ण संख्या पाहूनच मुख्यमंत्र्यांनी शेवटचा इशारा देत ‘नियम पाळा अन्यथा लॉकडाऊनला समोर जा’ असा इशारा दिला आहे. 

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी लस काढल्या आहेत. या लसी शंभर टक्के प्रभावी नसल्या तरी कोरोनाशी दोन हात करण्यास सक्षम आहेत. भारतानेही कोविशील्ड आणि को वॅक्सीन अशा दोन लसी काढल्या आहेत. सरकारकडून नागरिकांनी या लसी घ्याव्या असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे.

लस घेण्यावरून नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. ही लस खरच प्रभावी आहे का? लस लावल्यानंतर कोरोना होणार नाही याची खात्री काय? अनेकांनी लस घेतल्यानंतरही कोरोना झाला, मग याचा उपयोग काय? असे प्रश्न लसीबाबत उपस्थित करण्यात येत आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना होत आहे. अनेकांना याचा दुष्परिणाम सोसावे लागत आहे. यामुळे लसीपासून नागरिक दूर जात असल्याचे दिसून येत आहे.

आधी दुसऱ्यांना लस घेऊ द्या. ते बरे झाले म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही, असे म्हणत अनेकजण लस घेण्याचे टाळत आहे. लस बेकार आहे. याचा काहीही उपयोग नाही. सरकारने ही लस शुल्क न आकारता द्यायला हवी. शुल्क आकारण्याची काय गरज आहे? असे म्हणत आपला रोष व्यक्त करीत आहे. मात्र, वेळीच कोरोना लस न घेतल्यास याचे मोठे दुष्परिणाम सोसावे लागतील. लसीबाबत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहे.

प्रश्न - लस का घ्यावी?
उत्तर - कोरोनामुळे शंभर लोकांमध्ये दोन ते चार जणांचा मृत्यू होत आहेत. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात एक इतके कमी प्रमाणात आहे. तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसीकरण करणे आवश्यक आहे.

प्रश्न - लसीकरणाची कार्यक्षमता आहे का?
उत्तर - सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्यूपासून बचाव करण्यासाठी शंभर टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरुद्ध अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.

प्रश्न - लस सुरक्षित आहे का?
उत्तर - सर्व लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

प्रश्न - आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का?
उत्तर - आता तरी सगळीकडे कोविशिल्ड-सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवॅक्सीन आहे. दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत. त्यामुळे जे उपलब्ध आहे ते घ्या.

प्रश्न - दुसऱ्या टप्प्यात कोण-कोण लस घेऊ शकतो?
उत्तर - ६० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडणीचे आजार आदी यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसीकरण केंद्रामध्ये येऊन नोंदणी करावी.

प्रश्न - लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होऊ शकतात?
उत्तर - ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्व सामान्य दुष्परिणाम साधारणपणे दिसतात. ते एक ते दोन दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल/क्रोसीन या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत. वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वित झाल्याचे लक्षण आहे.

प्रश्न - लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?
उत्तर - लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे. उपाधीपोटी जाऊ नये. लसीकरण सेंटरवर कमी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्किटे, सरबत किंवा लिंबू सरबत घेऊन जावे. तसेच जाताना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन जावे.

प्रश्न - लस किती वेळा घ्यावी?
उत्तर - पहिला डोस घेतला की साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.

प्रश्न - कॅन्सर व इतर आजाराच्या रुग्णांनी लस घ्यावी का?
उत्तर - नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसीकरण करून घ्यावे. 

प्रश्न - हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड घेणाऱ्या लोकांनी लस घ्यावी का?
उत्तर - मुळात लस याच लोकांसाठी बनली आहे. ज्यांना असे आजार - Co-morbidity आहेत. फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्याने लसीकरण करावे.

प्रश्न - ॲलर्जिक ब्रोन्कायटीस (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?
उत्तर - नक्कीच घेऊ शकता. परंतु, ॲलर्जी खूप तीव्र असेल तर डॉक्टरांचा  सल्ला घ्यावा. 

प्रश्न - कोविड होऊन गेल्यावर पण लस घ्यावी का?
उत्तर - हो. कारण, कोविड नंतर बनणाऱ्या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधीपर्यंत राहतात.

प्रश्न - नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी?
उत्तर - कोविड होऊन गेल्यावर ८ ते १२ आठवड्यांनी लस घ्यावी.

प्रश्न - लहान मुलांना लस द्यावी का?
उत्तर - १६ वर्षांखालील मुलांना देऊ नये.

प्रश्न - गर्भवतींना लस द्यावी का?
उत्तर - सध्या त्याचा डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तरी देऊ नये.

प्रश्न - लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?
उत्तर - लसीकरण नंतरही हलगर्जीपणा चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.

प्रश्न - लस नंतर शंभर टक्के कोरोना होणार नाही का?
उत्तर - असे अजिबात नाही. पण, झाला तरी तो सौम्य असेल.

प्रश्न - जर लस घेऊनही कोरोना होणार असेल तर लसीचा हेतू काय?
उत्तर - कोविडची दुसरी लाट टाळणे. मृत्यू दर कमी करणे व गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी करणे.

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे
सर्वांनी लसीकरण करून स्वतःला व कुटुंबाला कोरोना संक्रमणापासून सुरक्षित ठेवायला हवे. पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसानंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते. पण त्यासाठी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा सोपा पर्याय आहे. कोणतीही शंका मनात न ठेवता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. अविनाश गावंडे,
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com