दुबईच्या कोविड रुग्णालयात सेवा देत होता नागपूरचा योद्धा... मिटले डोळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जून 2020

नागपूरचे 61 वर्षीय डॉक्‍टर सुधीर वाशिमकर अनेक वर्षांपासून दुबईत डॉक्‍टर सेवा देत होते. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ते दुबईतील कोविड वॉर्डमध्ये काम करीत होते. रुग्ण सेवा देताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

नागपूर : जगात आणि देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेकांनी घराबाहेर निघणेही बंद केले. कुणाला मदतीचाही हातही दिला नाही. अशा गंभीर काळात डॉक्‍टर्स प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. मात्र, रुग्ण सेवा करताना त्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. अशीच कोरोनाची लागण होऊन नागपुरातील डॉक्‍टर सुधीर वाशिमकर यांचे शनिवारी दुबईत निधन झाले. 

कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. दररोज वाढणारी रुग्ण संख्या पाहून चिंता व्यक्‍ती केली जात आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राशासन कठोर परिश्रम घेत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून डॉक्‍टर, पोलिस, सफाई कर्मचारी, परिचारिका, समाजसेवक आदी सेवा देत आहेत. त्यांनी कोरोनाची भीती दूर सारून समाजसेवेचा विडा उचचला आहे. असे असताना कोरोना त्यांनाही मृत्यूच्या दाढेत ओढत आहे.

हेही वाचा - मुंबईतून निसर्ग वादळ जात नाही तोच दुसरं मोठं राजकीय वादळ

आजवर अनेक पोलिस, डॉक्‍टरांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. तसेच त्यांच्यावर नागरिकांकडून हल्लेही झाले आहेत. मात्र, त्यांनी सेवाधर्म सोडला नाही. कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी त्यांचा सतत संघर्ष सुरू आहे. यासाठी ते दिवसरात्र सेवा देत आहेत. यामुळेच त्यांना "फ्रंटलाईन वॉरिअर्स' म्हणून संबोधले गेले आहे. आता मात्र त्यांचाच जीव धोक्‍यात आला आहे. 

नागपूरचे 61 वर्षीय डॉक्‍टर सुधीर वाशिमकर अनेक वर्षांपासून दुबईत डॉक्‍टर सेवा देत होते. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ते दुबईतील कोविड वॉर्डमध्ये काम करीत होते. रुग्ण सेवा देताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र, कोरोना रुग्णांची सेवा करताना डॉक्‍टर सुधीर यांचा शनिवारी कोरोनामुळेच मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी - तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून काढत घराच्या अंगणात ठेवला अन्‌ रडत रडत पळून गेला...

डॉक्‍टरांचे प्रयत्न निष्फळ

डॉक्‍टर सुधीर यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटवर लावले होते. डॉक्‍टर त्यांचा जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. तरीही डॉक्‍टरांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पंधरा दिवसांच्या लढ्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आणि डॉक्‍टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. 

मेडिकलचे माजी विद्यार्थी

सुधीर वाशिमकर यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम डी मेडिसीन पूर्ण केले होते. ते वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी 1977 मध्ये मेडिकलमधून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर मेडीकल, मेयोत अधिव्याख्याता पदावर काम केले होते. दहा वर्षांपासून ते दुबईत सेवा देत होते. त्यांच्या पश्‍चात स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नी, एक डॉक्‍टर मुलगा आहे. दोघेही त्याच्याबरोबर दुबईत राहत होते. तर दुसरा मुलगा चेन्नईला राहतो.

क्लिक करा - का दिला सीबीएसई शाळांना कारवाईचा इशारा, जाणून घ्या

समाजसेवा म्हणून मोफत कार्य

डॉ. सुधीर वाशिमकर यांना रुग्णसेवेतून समाधान मिळत होते. त्यामुळे ते सर्वांचे चाहते होते. त्यांनी आयजीजीएमसीएच आणि महाराष्ट्रातील अन्य जीएमसीएचमध्ये काम केले होते. तसेच समाजसेवा म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी मोफत सेवाही दिली. समाजाचे काही देणे लागते याच विचारातून ते समाजासाठी कार्य करती होते. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हाणी झाली आहे. सुपर स्पेशालिटीत हृदय रोग तज्ज्ञ डॉ. सुनील वाशिमकर यांचे ते काका होत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sudhir WashimKar dies in Dubai