डॉ. सुप्रिया जोपासतेय राजस्थानी पिचवाई चित्रांचा वारसा, 'एशिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये मिळाले स्थान

अनिल कांबळे
Wednesday, 20 January 2021

डॉ.सुप्रिया फुलारे-दुधाळ या मूळच्या नागपुरातील असून त्यांनी शासकीय चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. त्यांनी शिक्षण घेताना मतीमंद-विकलांग बालकांसाठी जाहिरात कॅम्पेन राबविले होते.

नागपूर : चारशे वर्षांपूर्वीचा राजस्थानी चित्रकलेचा प्रकार म्हणजे पिचवाई चित्रकला असून सध्या राजाश्रय मिळत नसल्यामुळे ती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याचा उपराजधानीतील डॉ. सुप्रिया फुलारे-दुधाळ यांनी पिचवाई कलेचा वारसा जोपासल्याने पिचवाई चित्रांना 'एशिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये स्थान मिळाले आहे. या कलेला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

हेही वाचा - हळद लागण्यापूर्वीच नियतीने साधला डाव, एकाच खड्ड्याने केला दोन मित्रांचा घात

डॉ.सुप्रिया फुलारे-दुधाळ या मूळच्या नागपुरातील असून त्यांनी शासकीय चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. त्यांनी शिक्षण घेताना मतीमंद-विकलांग बालकांसाठी जाहिरात कॅम्पेन राबविले होते. २००१ ला गतीमंदासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या कार्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेत डॉ. सुप्रिया यांचा जाहीर सत्कार केला होता. त्यानंतर त्यांनी अपंग-गतीमंद मुलांसाठी अनेक उपक्रम राबवून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून दिला होता. २००३ मध्ये त्यांचे पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या युवकाशी लग्न झाले. त्यांनी पुण्यातील अभिनव चित्रकला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. त्यानंतर डी.वाय. पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत चित्रकलेला नवीन झळाळी दिली. यादरम्यान त्यांना २००५ ला सुप्रिया यांना युके (लंडन)ला जावे लागले. २००८ मध्ये त्या भारतात परत आल्या. त्यांनी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स (एमएफए) पूर्ण केले. त्यांनी पुन्हा चित्रकलेला व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्याने सुरुवात केली. केंद्रीय विद्यालय पुणे येथे आर्ट टिचर म्हणून नोकरी केली. त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'द स्टडी ऑफ इंडियाज डिसेबल, ऑर्फन चिल्ड्रेन टू गिव्ह फ्यूचर टू देम थ्रू द आर्ट ऑफ अ‌ॅडव्हर्टाईजींग' या विषयात पीएचडी केली. 'वेद क्रिएशन' स्थापन केली. त्या माध्यमातूनही त्यांनी चित्रकलेला व्यावसायिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा - चित्रपट नव्हे, तर सत्य घटना! शुभमंगलापूर्वी 'तो' म्हणाला 'ही' माझी प्रेयसी अन्...

असा केला विश्‍वविक्रम - 
प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित चित्रांचा समावेश पिचवाई चित्रकलेत केला जातो. सुप्रिया यांनी विश्‍वविक्रम करण्याचे ठरविले. त्यांनी सुप्रिया आर्ट्स वर्ल्ड इव्हेंटच्या (सॉ) वतीने पुण्यातील केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात विश्‍वविक्रम केला. यामध्ये त्यांनी १२ दिवसांत पिचवाई कलेचे तब्बल ८२ चित्रे रेखाटले. 

रांगोळीला मिळवून द्यायचा व्यावसायिक दर्जा -
डॉ. सुप्रिया यांना रांगोळीला व्यावसायिक दर्जा मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी आतापर्यंत गणपतीच्या अनेक रांगोळी साकारल्या आहेत. त्‍यांनी रांगोळीतून गणपती तसेच गणपतींची मूर्ती साकारणाऱ्या आर्टिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. २०१७ ला नागपुरात साडेतीन दिवसांत '१११ शेड्स ऑफ विनायका' नावाने रांगोळी तयार केली. याच रांगोळीला 'लिमका बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' अवार्ड मिळाला. लंडनमध्ये 'एशियन आर्टीस्ट ऑफ दी ईयर' हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr supriya have collection of pichawai arts record in asia book of record