महानिर्मितीमुळेच वीज महागली? ग्राहकांना भुर्दंड; वीज उत्पादक कंपन्यांची नाराजी 

योगेश बरवड 
Friday, 23 October 2020

सर्वात कमी उत्पादन खर्च असणाऱ्या कंपनीकडून वीज खरेदी करण्याचे महावितरणवर बंधन आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत खर्च काहीसा अधिक असल्याने अधिक मागणीच्या काळातच महानिर्मितीची वीज खरेदी केली जाते.

नागपूर : ग्राहकांना वीजपुरवठ्याची जबाबदारी असणाऱ्या महावितरणकडून मेरीट ऑर्डर डिसपॅच (एमओडी)चा आधारावर विजेची खरेदी केली जाते. वीजनिर्मिती करणारी शासकीय कंपनी महानिर्मितीकडून दर निश्चिती धोरणाचे उल्लंघन करीत वेगळेच गणित मांडले जात आहे. याप्रकाराने वीज ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप खासगी वीज उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे. 

सर्वात कमी उत्पादन खर्च असणाऱ्या कंपनीकडून वीज खरेदी करण्याचे महावितरणवर बंधन आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत खर्च काहीसा अधिक असल्याने अधिक मागणीच्या काळातच महानिर्मितीची वीज खरेदी केली जाते.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

हा आजवरचा अनुभव होता. पण, खर्च कमी दर्शविण्यासाठी महानिर्मितीने वेगळाच ताळेबंद मांडल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. पुढे येऊन कुणीही बोलत नसले तरी त्यांच्या दाव्यात तथ्य आढळते. 

वीज उत्पादनाचा खर्चात कोळसा महत्त्वाचा फॅक्टर आहे. वेकोलिकडून महानिर्मितीला जवळपास ४५० प्रति मेट्रिक टन दराने कोळसा पुरवठा होतो. याशिवाय कोळशाचा दर्जाही महत्त्वाचा असतो. पुढील दोन महिन्यांच्या कोळशाच्या दराच्या आधारे एमओडी तयार होत असते. त्यानंतर प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी कोळशाच्या किमतीनुसार दर निश्चिती केली जाते. 

दाव्यानुसार, महानिर्मितीने जून महिन्यापासून कोळशावरील हा खर्चच दाखविणे बंद केले आहे. परिणामी प्रथमदर्शनी महानिर्मितीची वीज स्वस्त भासते आणि महावितरणला त्याच दराने वीज खरेदी करावी लागते. म्हणजेच कमी दरात वीज देणाऱ्या खासगी कंपन्या स्पर्धेतून आपसूक बाद होतात.

जाणून घ्या - अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

त्यानंतर महानिर्मितीकडून सुधारीत दराने शुल्क वसुली केली जाते. हाच भार अखेर ग्राहकांच्या माथी मारला जातो. दाव्यानुसार हा भार प्रतिग्राहक ४० ते ५० पैसेच येतो. पण, एकत्रित गणित मांडल्यास हे नुकसान फार मोठे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity rates become expensive due to MAHAGENCO