मुंढे जाताच मनपा अधिकारी सुस्त;  निम्मा महिना लोटूनही वेतन, पेन्शनची प्रतीक्षा 

योगेश बरवड
Tuesday, 15 September 2020

आयुक्त मुंढे यांची बदली होताच पहिल्याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनाला फटका बसला. मुंढे जाताच वित्त विभाग सुस्त झाल्याचे चित्र आहे. वेतनासंबंधी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही वित्त विभागाकडून वेतन जमा झाले नाही.

नागपूर : महापालिकेतील बिघडलेली आर्थिक घडी नीटनेटकी करीत माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यास सुरुवात केली. मात्र, ते शहरात जाताच पालिकेच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी पुन्हा सुस्त झाल्याने निम्मा महिना लोटल्यानंतरही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त कला जात असून निवृत्तीनंतर पेन्शनवर दिवस काढणाऱ्यांच्या खात्यात पेन्शनही जमा न झाल्याने त्यांचीही मोठी आर्थिक अडचण झाली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांना वेतन दर महिन्याला विलंबाने वेतनाची सवयच लागली होती. मात्र, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दोन महिन्यांमध्येच कर्मचाऱ्यांच्या वेतनाची घडी नीट बसविल्याचे एका कर्मचाऱ्याने नमूद केले. त्यामुळे गेली चार महिने कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वेतन मिळत होते. त्यामुळे मुंढेंच्या शिस्तीतही कर्मचारी वेतनामुळे आनंदी होते.

काटोल ते मुंबई व्हाया नागपूर! मराठमोळ्या आदित्य लोहेची कलाक्षेत्रात उत्तुंग झेप

आयुक्त मुंढे यांची बदली होताच पहिल्याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनाला फटका बसला. मुंढे जाताच वित्त विभाग सुस्त झाल्याचे चित्र आहे. वेतनासंबंधी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही वित्त विभागाकडून वेतन जमा न झाल्याचे महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले. गेल्या काही महिन्यात कर्मचाऱ्यांनी वेळेवर वेतन मिळत होते. परंतु आता पुन्हा महापालिका वेतनाबाबत जुन्याच मार्गावर आल्याने कर्मचाऱ्यांत पुन्हा संतापाचे वातावरण आहे.

पुढील काही महिने सणासुदीचे असून वेतनाच्या तारखेनुसार कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. परंतु त्यांचे नियोजन फसले. कर्मचारीच नव्हे तर केवळ पेन्शनवर आयुष्याची सायंकाळ काढत असलेले पेन्शनधारकांचीही स्थिती बिकट झाली आहे. केवळ पेन्शनवरच मदार असलेले अनेक पेन्शनधारक बॅंकेत फेऱ्या मारत आहेत. 

 

वित्त व लेखा अधिकारी गायब 

महापालिकेतील वित्त व लेखा अधिकाऱ्यांकडे अमरावती येथीलही प्रभार असल्याचे समजते. नागपूर व अमरावतीच्या प्रभारामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था आहे. वित्त व लेखा अधिकारी अनेक दिवस गायबच असतात, असेही या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वेतनासह इतर आर्थिक बाबींमध्ये विलंब होत असल्याचे समजते. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: employees Waiting for payment