यहॉं कल क्‍या हो किसने जाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

गुरुवारी दुपारी मतदान यंत्र तयार करण्यासंबंधी बैठक आयोजित करण्यात आल्याने ते बैठकीत हजर होते. याच वेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

पारशिवनी (जि. नागपूर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पारशिवनी येथे बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आलेल्या आयटीआय निदेशकाचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. प्रवीण देविदास भगत (वय 47, रा. अभ्यंकर नगर, नागपूर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा - केवळ धास्तीच की खरेच कुठे पाणी मुरते आहे? फोटो : प्रवीण भगत

 

प्रवीणवर जिल्हा परिषद निवडणुकीच्या सहाय्यक क्षेत्रीय अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते पारशिवनीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निदेशक पदावर कार्यरत होते. त्यांची पारशिवनी तालुक्‍यातील निवडणुकीकरिता नियुक्ती झाली होती. गुरुवारी दुपारी मतदान यंत्र तयार करण्यासंबंधी बैठक आयोजित करण्यात आल्याने ते बैठकीत हजर होते. याच वेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यावेळी बैठकीत उपस्थित असलेले तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी प्रवीण यांना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रवीण भगत यांचा निवडणुकीच्या कार्यादरम्यान कर्तव्यावर असताना मृत्यू झाला असा अहवाल तात्काळ पाठविला. भगत यांच्या परिवाराला सानुग्रह राशी मिळण्यात यावी, अशी मागणी निवडणूक कार्याकरिता आलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: employe''s death by heart attack on duty in Parshivani