"साहेबराव'ने झटकला पंजा अन फसला देशातील पहिला प्रयोग... वाचा

राजेश रामपूरकर
शनिवार, 18 जानेवारी 2020

साहेबराव अर्धवट शुद्धीवर येत असताना त्याला पायाला काहीतरी लावल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने दोन ते तीनदा पाय आपटला आणि शरीराचे आकुंचन केले. परिणामी, त्याला लावलेला कृत्रिम पाय निघाला. पशुवैद्यकीय अधिकारी, गोरेवाडा प्रशासन आणि तांत्रिक सल्ल्यानुसार संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवली, तरीही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर : हत्ती, घोडा आणि कुत्र्यांना कृत्रिम पाय बसवण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर गोरेवाडा बचाव केंद्रातील पायाची बोटे गमावलेल्या "साहेबराव' या वाघाला कृत्रिम पाय बसवण्याचा प्रयोग आज झाला. मात्र, त्याने कृत्रिमरीत्या बसवलेला पाय लगेच काढून टाकला. त्यामुळे "साहेबराव'ची डौलदार चाल पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हा प्रयोग अयशस्वी झाला असला तरी पशुवैद्यकीय डॉक्‍टर आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत बाभूळकर यांनी पुन्हा अशी शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. ते म्हणाले, वाघाला कृत्रिम पाय बसवण्याचा जगातील हा पहिला प्रयोग असल्याने काही गोष्टींचा अभ्यास कमी पडला आहे. वाघ हा मार्जार कुळातील प्राणी आहे. या प्राण्याची शरीर आकुंचन पावत असल्याची पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे त्याचा विचार आम्ही शस्त्रक्रिया करताना केली नाही. वाघाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बेशुद्ध करून कृत्रिम पाय लावला. शस्त्रक्रियेनंतर त्याला पिंजऱ्यात हलविण्यात आले.

साहेबराव अर्धवट शुद्धीवर येत असताना त्याला पायाला काहीतरी लावल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने दोन ते तीनदा पाय आपटला आणि शरीराचे आकुंचन केले. परिणामी, त्याला लावलेला कृत्रिम पाय निघाला. पशुवैद्यकीय अधिकारी, गोरेवाडा प्रशासन आणि तांत्रिक सल्ल्यानुसार संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवली, तरीही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माणसाला अशी शस्त्रक्रिया करताना काळजी घेता येते. परंतु, वन्यजीवांच्या वर्तनाचा हवा तसा अभ्यास नसल्याने शस्त्रक्रिया करताना काय काळजी घ्यावी, हे कळले नाही.

या प्रयोगातून आता काही अडचणी लक्षात आल्या आहेत, त्या दूर करून पुढे या वाघाला कृत्रिम पाय लावण्याचा प्रयोग करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जगभरातील पशुवैद्यकीयतज्ज्ञ आणि अस्थिरोगतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यांच्याकडील अनेक प्रयोगांचे दाखले दिले. वाघावर शस्त्रक्रिया करण्याच्या पहिल्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. आज वाघाला कृत्रिम पाय लावण्याला यश आले नसले तरी त्याला होणाऱ्या असह्य वेदनेतून मुक्तता केली आहे, याचा आनंद आहे. त्यामुळे 50 टक्के युद्ध जिंकल्याचा आनंद आहे, असे डॉ. बाभूळकर म्हणाले.

- हवालदार।! तु सुद्धा...लाखोंचा गंडा आणि जेलचे वारे

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्राचे प्रमुख डॉ. शिरीष उपाध्ये म्हणाले, वाघासारख्या प्राण्यांना बेशुद्ध करून शस्त्रक्रिया करणे आव्हानाचे काम होते. यापूर्वी केलेल्या दोन शस्त्रक्रियेमुळे साहेबरावचे जीवन सुसह्य झाले आहे. शिकाऱ्याच्या ट्रॅपमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथील जंगलात या वाघाचा पाय अडकल्याने डाव्या पायाची तीन बोटे गमवावी लागली होती. ती शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या पायाला होणाऱ्या वेदना असह्य होत्या. त्यामुळे तो वाघ 24 तास सतत वेदनेमुळे कन्हत होता. त्यातून त्याची सुटका करण्यासाठी डॉ. सुश्रुत बाभूळकर यांनी वाघाला दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतले.

- बंटी और बबली नंतर आता पिंकीही...

त्यानंतर 2018 मध्ये वेदना कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर कृत्रिम पाय लावण्याच्या दृष्टीने अनेक संशोधनाचा अभ्यास केला. काही देशांमधील डॉक्‍टरांसोबत चर्चाही झाल्या. त्यातून नव्याने संशोधित झालेल्या काही प्रयोगांतून कृत्रिम पाय लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पायाचे मोजमाप घेण्यात आले. पायाचा पंजा अत्याधुनिक साहित्यांचा वापर करून तयार करण्यात आला. यासाठी 100 टक्के स्थानिकांची मदत घेण्यात आली. आज सकाळी कृत्रिम पाय लावण्याची धाडसी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, काही कारणांमुळे ती अयशस्वी ठरली आहे.

ही शस्त्रक्रिया करताना महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील पशुवैद्यकीय डॉक्‍टरांची चमू डॉ. गौतम भोजने, डॉ. विनोद धूत यांच्यासह लिड्‌स युनिव्हर्सिटीचे (युके) डॉ. पीटर, विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे, डॉ. मयूर पावसे, डॉ. शामली, डॉ. गावंडे, सहायक वनसंरक्षक सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी पांडुरंग पाखले यांनी मोलाची भूमिका पार पाडली. यावेळी माफसुचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर आणि महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामबाबू उपस्थित होते.

घटनाक्रम...  
26 एप्रिल - 2012 : गोंड मोहाडी जंगलात बहेलिया या शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये वाघाचा पाय अडकला.  
27 एप्रिल 2012 : सेमिनरी हिल्स येथील नागपूर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या शेजारील परिसरात उपचारसाठी आणले.  
जून 2012 : प्रकृती अस्वास्थामुळे महाराजबाग प्राणीसंग्रहालयात हलविले.  
25 जुलै 2016 : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये हलविले.  
17 जून 2018 : मध्ये डॉ. सृश्रृत बाभूळकर यांनी साहेबरावला दत्तक घेतले.
9 ऑगस्ट 2019 : कृत्रिम पाय लावण्याच्या दृष्टीने प्रथमिक तपासणी.  
19 आक्‍टोबर 2019 : वाघाच्या पायाच्या वेदना कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया.
18 जानेवारी 2020 : कृत्रिम पाय लावण्याची शस्त्रक्रिया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: experiment of artificial leg implant unsuccessful