प्रपंचाची चिंता असल्याने गव्हाला ओलित करण्यासाठी सकाळीच शेतात गेला अन् झाले अघटित

मनोज खुटाटे
Monday, 25 January 2021

रानवाडी येथील तरुण ३५ वर्षांचा शेतकरी शेतातील गव्हाला पाणी ओलित करण्यासाठी सकाळी सहा वाजताच मोटार चालू करण्यासाठी तलावावर गेला. मीटरपेटी उघडून मोटार चालू करण्यापूर्वीच पेटीला स्पर्श करताच विजेचा करंट लागला व त्याचा जगीच मृत्यू झाला.

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतंत्य बिकट आहे. खरीप पिकाने व फळ पिकाने धोका दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकावर टिकून आहेत. पण, रब्बी पीक जोमात यावे, यासाठी पिकांना ओलित करणे आवश्यक आहे. महावितरणचा अजब कारभार असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बे-रात्री ओलितासाठी शेतात जावे लागते व त्यातून अपघात होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. असाच प्रकार नरखेड तालुक्यातील रानवाडी शिवारात झाला व एक तरुण शेतकऱ्यांचा करंट लागून मृत्यू झाला.

नरखेड तालुक्यातील रानवाडी शिवारात रानवाडी तलाव आहे. पण, तलावातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे तलावाचा पाहिजे तसा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. म्हणून शेतकरी तलावावरच मोटारपंप व मीटरपेटी लागून शेतातील पिकांचे ओलित करतात.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

रानवाडी येथील तरुण ३५ वर्षांचा शेतकरी शेतातील गव्हाला पाणी ओलित करण्यासाठी सकाळी सहा वाजताच मोटार चालू करण्यासाठी तलावावर गेला. मीटरपेटी उघडून मोटार चालू करण्यापूर्वीच पेटीला स्पर्श करताच विजेचा करंट लागला व त्याचा जगीच मृत्यू झाला.

मृत शेतकऱ्याचे नाव राजेंद्र अजाबराव खरपुरिया ( वय ३५, रा. रानवाडी) असे आहे. त्याचे वडील डॉक्टर असून, खासगी व्यवसाय करतात. तर मृत व त्याचा भाऊ हे सहा एकर शेती करून प्रपंच चालवीत होते. राजेंद्रच्या मृत्यूने कुटुंबातच नव्हे, तर गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे म्हातारे आई वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत.

नक्की वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. शवविच्छेदनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अस्कमात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. एका तरुणाचा जीव गेला तरी महावितरणचा कोणताच अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. यावरून महावितरण कंपनी किती संवेदनशील आहे, याचा परिचय पुन्हा नागरिकांना झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer of Narkhed taluka dies due to electric shock Farmers death news