
तहसीलदार वरुण सहारे आणि मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी कन्हान येथे विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेत रस्त्यावर उतरत तारसा चौकात ४९ जणांना २४,५०० रुपयांचा दंड ठोठावला. पारशिवनी येथे ११ जणांकडून साडेपाच हजारांची वसुली केली.
टेकाडी (जि. नागपूर) : सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीस मास्क घालणे बंधनकारक असले तरी अनेक जणांकडून या नियमाचे उल्लंघन होते. वाढता कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केले जात आहेत. तहसीलदार वरुण सहारे यांनी खुद्द मोर्चेबांधणी करीत विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांकडूनही कारवाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरताना ‘ए भाई मास्क पहेनके चलो’, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २४ आणि २५ नोव्हेंबरला कन्हान नगर परिषदेकडून मोहीम हाती घेत विनामास्क फिरणाऱ्या २७ जणांवर कारवाई करीत १३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. पारशिवनी शहरात २५ नोव्हेंबर रोजी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच २४ जणांवर कारवाई करीत १२ हजारांचा दंड वसूल केला.
तहसीलदार वरुण सहारे आणि मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी कन्हान येथे विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेत रस्त्यावर उतरत तारसा चौकात ४९ जणांना २४,५०० रुपयांचा दंड ठोठावला. पारशिवनी येथे ११ जणांकडून साडेपाच हजारांची वसुली केली. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तालुका प्रशासन, नगर परिषद प्रशासनाचे पथक आणि कन्हान पोलिसांसह वाहतूक पोलिसांचे पथक मोहिमेत सहभागी झाले.
शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. अनेक लोक मास्क न लावताच फिरतात. काहींचे मास्क नावापुरतेच कानाला लटकलेले दिसते. तोंड आणि नाक उघडे ठेवून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवत तरुणांचे समूह प्रत्येक भागातच उभे असल्याचे चित्र आहे. या प्रकारानंतर दोन दिवसांपासून मास्क न लावणाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईने चांगलाच जोर धरला.
हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?
अनेक युवकांनी जीवघेणा पळ काढला तर काहींनी नानाविध कारणांची यादी पोलिसांना दिली. तर काहींनी राजकीय वरदहस्तांकडे वर्णी लावल्याने ‘अरे तो आपला माणूस आहे...सोडा त्याला’ अशा फोनमुळे अधिकारी, कर्मचारी संकटात सापडले. असेच सुरू राहिले तर कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे काहींनी सांगितले.
नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी असेल. या लाटेला वेळीच थांविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तालुक्यात विनामास्क कुणीही फिरू नये. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनाविरोधात लढताना मास्क बंधनकारक आहे. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा.
- वरुणकुमार सहारे,
तहसीलदार पारशिवनी
सविस्तर वाचा - व्हॉट्सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या
आवश्यक असल्यास घरबाहेर पडा
नागरिकांनी आवश्यक असल्यासच घरबाहेर पडावे. निघताना मास्कचा वापर करण्याची सवय लावून घ्यावी. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्याला सहकार्य करावे. भाजी विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी जेणेकरून येणाऱ्या रोगाला वेळीच थांबविता येईल.
- गिरीश बन्नोरे,
मुख्याधिकारी, नगर परिषद, कन्हान
संपादन - नीलेश डाखोरे