
डॉ. विकास आमटेंचे माजी सहाय्यकांनी पोलिसांत तक्रार देत गंभीर आरोप लावले असून आम्हाला घर खाली करायला लावल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसेच बाबा आमटेंचे जे सहकारी होते त्यांच्या मुलाने देखील या वादात उडी घेत महारोगी सेवा समितीकडून कार्यकर्त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली होती.
चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सद्स्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता आमटे कुटुंबीयांनी निवेदन जारी करून शीतल आमटे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्या आरोपांशी आमटे कुटुंबीय सहमत नसल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. मात्र, हा वाद नेमका काय आहे?
हेही वाचा -आनंदवनातील वाद : शीतल यांचे आरोप तथ्यहीन, आमटे कुटुंबीयांनी जारी केले निवेदन
बाबांनी उभारलेले आनंदवन -
समाजसेवक बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची उभारणी केली. संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना याठिकाणी आश्रय मिळाला. बाबांनी त्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. मात्र, कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद्र किंवा रुग्णालय होऊ नये, याकडेही बाबांनी लक्ष दिले होते. त्यामधूनच त्यांनी कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी केली. त्यांच्याबरोबर साधना आमटे यांनी देखील कष्ट उपसले. दोघांच्या मेहनतीमधून आनंदवन दिमाखात उभे राहिले. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करून जगायला शिकविले, ते बाबा आणि साधना आमटे यांनीच. बाबांच्या निधनानंतर कारभार त्यांचे सुपूत्र विकास आमटे यांच्यावर सोपविला. त्यांनी काही काळ कारभार सांभाळल्यानंतर त्यांच्या मुलगा कौस्तुक यांची महारोगी सेवा समितीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र, मुलगी शीतल आमटे करजगी यांना समितीवर स्थान दिले. आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलीला सोपविल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
हेही वाचा - कन्याकुमारी शिल्पकारांच्या जन्मभूमीचा कायापालट; पीयूष गोयल यांनी घेतले होते दत्तक ग्राम टिमटाळा
आनंदवन कार्पोरेटच्या वाटेवर असल्याचे आरोप -
बाबांच्या स्वप्नातून उभे राहिलेल्या आनंदवनातील अनेक उपक्रम नव्या पिढीच्या काळात बंद पडल्याचा आरोपही केला गेला. कुष्ठरुग्णांनी स्वयंपूर्ण व्हावे म्हणून आनंदवनात अनेक उत्पादने तयार व्हायची. त्यांची तडाखेबंद विक्रीही होत असे. येथील प्रकल्पात तयार होणाऱ्या चाळण्या, गाळण्या आजही अनेकांच्या घरी असतील. आनंदवनच्या सतरंज्या, चादरी, टॉवेल, बैठकीचे जाजम यालाही खूप मागणी असे. आता ही उत्पादने नाहीशी झाली आहेत, असेही बोलले जाते. कुष्ठरोग्यांच्याच हातून येथील वस्तू तयार व्हाव्यात, असा बाबांचा आग्रह होता. मात्र, त्याला कार्पोरेटचे स्वरुप देत असल्याचा आरोप नव्या पिढीवर करण्यात आला. याबाबत आनंदवनातील दोन कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. डॉ. विकास आमटेंचे माजी सहाय्यकांनी पोलिसांत तक्रार देत माझ्यावर गंभीर आरोप लावले असून आम्हाला घर खाली करायला लावल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसेच बाबा आमटेंचे जे सहकारी होते त्यांच्या मुलाने देखील या वादात उडी घेत महारोगी सेवा समितीकडून कार्यकर्त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
हेही वाचा - बापरे! एकाच जिल्ह्यात ११ महिन्यात २५३ शेतकऱ्यांच्या...
पालकमंत्र्यांकडून दखल -
दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आनंदवनमधील वाद, तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून, त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येऊ देऊ नये. आमटे कुटुंबीयांनी स्वत: पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. केवळ राज्यच नाही तर देश-परदेशातून अनेकांनी आमटे कुटुंबातील हे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून 'आनंदवन'शी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावंतांनी आमटे कुटुंबाशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बाबा आमटे तसेच आनंदवनापासून प्रेरणा घेऊन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटेंना एक पत्र लिहून हे वाद मिटवावेत, अशी विनंती केली होती.
हेही वाचा - शेतमजूर असलेल्या दिलीपची 'ही' संपत्ती पाहून...
शीतल आमटेंचा वादग्रस्त व्हिडिओ -
महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. हा व्हिडिओ दोन तासांतच माध्यमावरून हटविण्यात आला होता.
हेही वाचा - युवकाला पडले रातोरात श्रीमंत झाल्याचे स्वप्न; सकाळी कोंबडा आरवताच केला आत्महत्येचा...
आमटे कुटुंबीयांचे निवेदन -
शीतल आमटे करजगी यांनी व्हिडिओत केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले आहे. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली आहे. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचे या चौघांनी म्हटले आहे. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला आहे. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली आहे. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटय़ावर आले आहेत.
संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत