नाट्यगृहाचा पडदा उघडला, पण किरायाचे काय? नाट्यनिर्माते चिंतेत

Fifty percent capacity worries the artist
Fifty percent capacity worries the artist

नागपूर : राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु, नाट्यगृहाच्या भाड्याबाबत कुठलेही धोरण स्पष्ट केले नाही. त्यामुळे नाट्यगृह व्यवस्थापनाकडून आकारले जाणारी किरायाच्या रकमेने कलावंत तसेच नाट्यनिर्मात्यांच्या चिंतेत भर पडली आहे. परिणामी नाट्यगृहाचा पडदा उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी नाट्यप्रेमींना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

नाट्यगृहाचा पडदा उघडला जाणार असल्याने कलावंत व निर्माते यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अवाढव्य भाड्यामुळे धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ठप्प असलेला नाट्यव्यवहार लगेच ताळ्यावर येण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाही. राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु, भाड्याबाबत कुठेही स्पष्ट केले नाही.

शहरातील देशपांडे सभागृह, सायंटिफिक सभागृह, महापालिकेचे सुरेश भट सभागृहाचे मोठे भाडे आहे. ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे पाचशे ते सातशे रुपयांची तिकिटे खरेदी करून कुणीही नाटक बघण्यास प्राधान्य देणार नाही. परिणामी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा खाजगी नाट्यगृहाचे भाडे कमी करण्यात यावे, या मागणीने शहरात जोर धरला आहे.

एवढेच मुंबईतील नाट्यसंस्थाही अवाढव्य भाडे व ५० टक्के क्षमतेमुळे नागपुरात येणे शक्य नाही. शहरातील काही नाट्य निर्मात्यांनी भाडे कमी करण्याची मागणी केली. कलावंतांची कला जोपासण्यासाठी राज्य सरकार, महापालिकेने पुढाकार घेण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. सध्या शहरातील महापालिकेचे सुरेश भट सभागृह सर्वच बाजूने नाटकांसाठी अनुकूल आहे. एवढेच नव्हे महापालिकेने कोरोनाच्या काळातही या सभागृहात सॅनिटायझेशन आदींवर भर दिला.

आज शहरातील काही कलावंतांनी सुरेश भट सभागृहात नटरंगाची पूजा केली. नाटकांना सुगीचे दिवस येऊ दे, असे साकडे नटरंगाला या कलावंतांनी घातले. त्याचवेळी भाडे कमी करण्यासंदर्भात महापालिकेने पुढाकार घेण्याचीही गरज व्यक्त केली. सद्यःस्थितीत नाटकांसाठी नागपूरकर नाट्यप्रेमींना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाडे कमी करण्याशिवाय पर्याय नाही
महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच खाजगी नाट्यगृह संचालकांनी भाडे निम्मे केले तरच नाटकांचे प्रयोग होतील. ५० टक्के प्रेक्षक क्षमतेत पूर्ण भाडे देणे परवडणारे नाही. याशिवाय प्रेक्षकांनाही महागडे तिकीट विक्री करता येणार नाही. त्यामुळे भाडे कमी करण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय निर्मातेही पुढे येणार नाही.
- समीर पंडित, नाट्यनिर्माते

अन्यथा कलावंत खचून जाईल
गेल्या आठ महिन्यांपासून निर्माते, कलावंत घरीच आहेत. त्यांची आर्थिक स्थितीही बिकट आहे. नाटक तसेच कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृहाचे भाडे ५० टक्क्यांपेक्षाही कमी करणे गरजेचे आहे. भाडे कमी केल्यास नाट्यक्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्यास हातभार लागेल. अन्यथा कलावंत खचून जाईल.
- अभय देशमुख,
अध्यक्ष, भाजप सांस्कृतिक आघाडी व कलावंत

सध्या तरी कुठलेही बुकिंग नाही
नाटकांसाठी सुरेश भट सभागृह सज्ज आहे. ५० टक्के क्षमतेने परवानगी मिळाल्याने दोन खुर्च्या सोडून प्रेक्षकांना बसावे लागणार आहे. सभागृह सॅनिटाईज करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळातही सभागृह नेहमी स्वच्छ व सॅनिटाईज करण्यात आले. परंतु सध्या तरी कुठलेही बुकिंग नाही.
- राहुल गायकी, सुरेश भट सभागृह

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com