नागपूर विद्यापीठाच्या परीक्षाबाबत अंतिम निर्णय होणार या महिन्यात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर एकीकडे विद्यार्थी संघटना आणि राज्यकर्ते यांच्यात सामना सुरू झालेला आहे. त्यातूनच काही विद्यापीठांनी परिपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर करण्याची भूमिका स्पष्ट केली.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने ऑनलाइन विद्वत परिषदेची बैठक नुकतीच घेण्यात आली. "गो टू मिटिंग' ऍपच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत सदस्यांची मते प्रभारी कुलगुरूंनी जाणून घेतली. यावेळी परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय राज्यपालांसोबत 25 जून रोजी होणाऱ्या बैठकीनंतरच होणार असल्याची माहिती सदस्यांना देण्यात आल्याचे समजते.

राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर एकीकडे विद्यार्थी संघटना आणि राज्यकर्ते यांच्यात सामना सुरू झालेला आहे. त्यातूनच काही विद्यापीठांनी परिपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर करण्याची भूमिका स्पष्ट केली.

यानुसार 1 ते 31 जुलैदरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वीच बॅक पेपरचे गुणांकन करणे आवश्‍यक असून त्यासाठी महाविद्यालयांनी तयार राहण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आज पार पडलेली विद्वत परिषदेची बैठक महत्त्वपूर्ण होती. यावेळी सदस्यांनी आपापले मत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ सदस्यांनी महाविद्यालयस्तरावर परीक्षा घेताना, आवश्‍यक त्या सुविधा विद्यापीठामार्फत मिळाव्यात अशी भूमिका घेतली.

अवश्य वाचा- अहो आश्‍चर्य! पळसाच्या झाडातून निघतेय सॅनिटायझर!!

याशिवाय काही सदस्यांनी त्या घेताना, विद्यापीठाकडे तयार असलेल्या प्रश्‍नपत्रिकांचा उपयोग करावा अशीही सूचना केली. काही सदस्यांनी महाविद्यालयस्तरावर होणाऱ्या परीक्षा आणि प्रात्यक्षिकांच्या गुणवत्तेबाबत काटेकोरपणा आणण्यावर भर दिला. याशिवाय अधिष्ठाता आणि परीक्षा नियंत्रकांनी महाविद्यालयस्तरावर अंतिम परीक्षा घेण्यापूर्वी "बॅक' पेपरच्या परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. यानंतर सर्व सूचना ऐकून यावर 25 जून रोजी राज्यपालांसोबत सर्व कुलगुरूंची बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळी हा सर्व "फिडबॅक' मांडल्या जाणार असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: final decision on Nagpur University exams will be taken after June 25 meeting