फायनान्स कंपनीने शेतकऱ्यांना घातला तब्बल ६० हजारांचा गंडा; धनादेशावर केली बनावट स्वाक्षरी 

Finance company did fraud with farmers in Yavatmal
Finance company did fraud with farmers in Yavatmal

यवतमाळ : साई मायक्रो अ‍ॅण्ड आदित्य फायनान्स कंपनीने 12 शेतकर्‍यांना एक लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून 60 हजार रुपये उकळले. शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकर्‍यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फायनान्स कंपनीचे मालक आदित्य पाटील (वय 46), व्यवस्थापक सचिन शिंदे (वय 32), एजंट अक्षय गावंडे (वय 30, रा. यवतमाळ) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. तिघांनी संगणमत करून शेतकर्‍यांना साई मायक्रो अ‍ॅण्ड आदित्य फायनान्स कंपनीकडून शेतीच्या सात-बारावर एक लाख रुपये कर्ज देतो, अशी बतावणी केली. 

अधिक वाचा - लॉकडाउनदरम्यान घरांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंग, सोनोग्राफी चाचण्यांमध्ये घट 

शेतकर्‍यांनी नोंदणीचे पैसे भरले. मात्र, कर्ज हवे असल्यास पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. 12 शेतकर्‍यांकडून पाच हजार रुपये याप्रमाणे 60 हजार रुपये उकळले. कर्ज न देता एचडीएफसी बँकेचे धनादेश दिले. शेतकरी धनादेश वटविण्यासाठी बँकेत गेले असता, स्वाक्षरी चुकीची असल्याचे सांगितले. 

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकर्‍यांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. याप्रकरणी विलास दत्तात्रेय रोहणे (वय 40, रा. केळापूर) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आदित्य पाटील, सचिन शिंदे, अक्षय गावंडे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
व्यवस्थापकाच्या अडचणीत वाढ

फायनान्स कंपनीकडे शेतकर्‍याने आपले राहते घर गहाण ठेवून कर्ज घेतले. मात्र, कंपनीच्या वतीने दिलेला धनादेश बँकेत दोनवेळा वटला नाही. त्यामुळे तरुण शेतकर्‍याने विषप्राशन करून आत्महत्या केली. श्यामसुंदर टेकाम असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शंकर टेकाम यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

त्यावरून साई मायक्रो फायनान्स व्यवस्थापक सचिन शिंदे (रा. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुन्हा शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. इतरही शेतकर्‍यांची त्याने फसवणूक केल्याची चर्चा आहे. या घटनांमुळे व्यवस्थापकाच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com