
कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही किराणा व्यवसाय, भाजीपाला विक्री, खाद्य पदार्थ आणि औषधी व्यवसायाला सुगीचे दिवस होते. हिच आशादायीबाब विजय सोमकुवर यांना प्रेरणा देणारी ठरली.
नागपूर ः टाळेबंदीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, पगार कमी झालेत. लक्षावधी युवक बेरोजगार झाले. अशा अस्थिरतेच्या काळात विजय सोमकुवर यांनी व्यावसायिक संधी हेरली. त्यांनी भाकर, पोळीला व्यवसायाचे माध्यम बनविले. ‘देशी रोटी’ व्यवसायात पदार्पण करून त्यांनी अल्पावधीतच नागपूरकर खवय्यांना देशी रोटीने भूरळ घातली आहे.
कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही किराणा व्यवसाय, भाजीपाला विक्री, खाद्य पदार्थ आणि औषधी व्यवसायाला सुगीचे दिवस होते. हिच आशादायीबाब विजय सोमकुवर यांना प्रेरणा देणारी ठरली. शहरात काही जणांकडे लांब रोट्या, भाकरी तयार करण्याचे कौशल्य असल्याचे त्यांना माहिती होते. पण, व्यवसायाच्या दृष्टीने उत्पादन दीर्घकाळ टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
यावर त्यांनी संशोधक वृत्तीने उपाय शोधला आणि व्यवसायाची पायाभरणी झाली. पत्नी प्रज्ञा सोमकुंवर यांचा या स्टार्टअपमध्ये मोलाचा वाटा आहे. प्रज्ञा यांची बहिण प्रणाली व त्यांचे पती अश्विन देवगडे यांचीही या व्यवसायात साथ लाभली आहे. ते दोघेही पुण्याला प्राध्यापक होते. टाळेबंदीमुळे दोघेही बेरोजगार झाले. सोमकुवर यांनी त्यांना धीर देत नव्या व्यवसायाची माहिती दिली.
त्यांनीही आता नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचा संकल्प केला आहे. देशी रोटीला घरगुती चव देण्यात आली आहे. यामुळे खवय्यांकडून मोठी मागणी आहे. स्विगी, झोमॅटो या अॅपवरसुद्धा रोटी मागविता येते. लवकरच आऊटलेट सुरू करण्याचा मानस असून तिथे बाजरी, मिक्स, ज्वारीची भाकरी, मक्याची रोटी आणि नागपूरच्या जगप्रसिद्ध असलेल्या लांब रोट्या किंवा मटका रोटी खरेदी करता येईल किंवा घरपोचही मिळेल. गरम करताच घरगुती चवीसह त्याचा आस्वाद घेता येणार आहे.
युवकांचे प्रेरणास्रोत
खाद्य प्रक्रिया उत्पादन क्षेत्रातील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यातून खाद्य प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या अनेक संधी विजय सोमकुवर यांचे लक्ष वेधत होत्या. त्यातून युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याची प्रेरणा मिळाली. आतापर्यंत देशात २५० पेक्षा अधिक खाद्य प्रक्रिया उद्योग त्यांच्या मार्गदर्शनात उभारले गेले. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिच्या (डिक्की) माध्यमातून इंडस्ट्रियल फायनान्स कार्पोरेशन ऑफ इंडिया (आयएफसीआय) व्हेंच्यर कॅपिटल फंडची २०१५ मध्ये सुरवात झाली होती. त्याचे भारतातील पहिले लाभार्थी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो .
जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
युवकांनो, व्यवसायात येताना घाबरण्याची गरज नाही. संधी खूप आहे, फक्त ती शोधावी लागणार आहे. उद्योग उभारण्यासाठी अर्थपुरवठा, प्रकल्प अहवाल, मार्केट आणि तांत्रिक माहिती देण्यात तयार आहे. आताही रेडी टू ईट खाद्य पदार्थ आणि औषधी व्यवसायात संधी आहे.
विजय सोमकुवर,
संचालक टीजीएन कॉर्पोरेट ॲडव्हायझर प्रा.लि.
संपादन - अथर्व महांकाळ