बनावट खतांचे तब्बल चार गोदाम सील; कृषी विभागाची धडक कारवाई; अवैध विक्रीचा प्रकार 

Four godowns of duplicate fertilizers are get sealed
Four godowns of duplicate fertilizers are get sealed

टेकाडी(जि. नागपूर) : रासायनिक खते तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना खतांमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या कन्हान क्षेत्रातील खत वितरण करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे चार गोदाम गुरुवारी (ता. १) रात्री जिल्हा कृषी विभागाने सील केले. नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. 

कन्हान स्थित एका ट्रान्सपोर्टला नागपूर जिल्हाअंतर्गत रासायनिक खतांची खेप विविध खत दुकानांमध्ये वितरक म्हणून विक्रीस पाठविण्याची परवानगी आहे. कन्हान रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रेल्वे मालधक्का वरून ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची खेप उचलून कन्हान येथील भाड्याने असलेले दोन आणि वराडा शिवारात कंपनीच्या स्वमालकीचे तीन अशा एकूण ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पाच गोदामांमध्ये खतांची खेप ठेवली जाते. गोदामात फक्त मालधक्का वरून आलेलं खात ठेवून ते रीतसर ट्रक द्वारे पाठविण्याची परवानगी ट्रान्सपोर्ट मालकाला होती. 

रासायनिक खताच्या नवीन बॅग निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना मोठ्या प्रमाणात जुन्या एक्सपायरी झालेल्या खताला २०१९-२० च्या हुबेहूब बनावटी कंपनीच्या बॅग मध्ये भरून भेसळ युक्त रासायनिक खात अवैध प्रकारे विक्री होत असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारला पारशिवणी तालुक्यातील कन्हान आणि वराडा येथील गोदामात जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोखंडे, मोहीम अधिकारी प्रवीण नागरगोजे, काँग्रेस ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, जिल्हा महासचिव गज्जू यादव,श्यामकुमार बर्वे, एपीआय अमित रंगारी, शरद गीते यांच्यासह धाड टाकली. पथकाला प्रथम दर्शनीच रासायनिक खतांमध्ये भेसळ करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत गुलाटी ट्रान्सपोर्टचे चार गोदाम सील करण्यात आले. 

कारवाई दरम्यान गोदामांमध्ये पथकाला वजन काटे, बॅग शिलाई मशीन आदींसह विविध रासायनिक खताच्या कंपनीच्या अनधिकृत बनावटी प्लॅस्टिक बॅग मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या. सोबत २०१४ ते २०१८ पर्यंतचा रासायनिक खतांचा साठा मिळाला. ज्याला नवीन बॅगमध्ये भरण्याचे काम सुरू होते. या साठ्याबद्दल कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत होती. 

गोदामात निकृष्ट दर्जाचे खत तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्राप्त झालेली होती. त्या अनुषंगाने कृषी पथकाला घेऊन आम्ही गोदामात धाड टाकली असता नियमबाह्य काम होत असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांना पंचनामे करून कारवाईचे आदेश दिलेले आहेत. 
-रश्मी बर्वे, 
जिल्हा परिषद अध्यक्षा 

संशयास्पद बाबी आढळलेल्या आहेत. कंपन्यांच्या रिकाम्या प्लॅस्टिक बॅग आढळल्या ज्यात रिपॅकिंगचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून आला आहे. पंचनामा आणि पाहणीला आठवडा भर लागेल. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. 
-प्रवीण नागरगोजे, 
मोहीम अधिकारी


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com