कॅन्सरचा विळखा : साडेतीनशेवर चिमुकले मृत्यूच्या दाढेत; ७ वर्षांत दगावले ४०० वर मुले

Four hundred children died of cancer in seven years cancer news
Four hundred children died of cancer in seven years cancer news

नागपूर : मागील सात वर्षांत मेडिकलच्या कॅन्सर विभागात (रेडिओग्राफी) एक हजारावर कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांनी प्रत्यक्ष उपचार घेतले आहेत. यातील चारशेवर चिमुकले कॅन्सरच्या वेदना सहन करीत दगावले. तर साडेतीनशेवर चिमुकले मृत्यूच्या दाढेत अडकले आहेत.

नागपुरातील मेडिकलमध्ये दरवर्षी तीन हजारांवर कॅन्सरग्रस्तांवर उपचार होतात. विदर्भातील कॅन्सरग्रस्तांची वाढती संख्या बघता मेडिकलमध्ये कॅन्सरग्रस्तांनीच तत्कालीन कॅन्सररोग तज्ज्ञ आणि मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. के. एम. कांबळे यांच्या मार्गदर्शनात २०१२ मध्ये लढा उभारला.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅन्सरग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटची घोषणा केली. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आरूढ झाले.

आता नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट होईलच असा विश्वास असतानाच भाजपप्रणित सरकारने मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगाबादला पळवले. यामुळे मेडिकलमधील कॅन्सर विभागात २००५ साली लावलेल्या कोबाल्ट यंत्रावरच कॅन्सरग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी डॉ. कांबळे यांनी ८ वर्षांच्या या काळात दहा ते बारा प्रस्ताव फडणवीस सरकारला सादर केले, मात्र उपयोग झाला नाही. 

पदव्युत्तर अभ्यासक्रम

राज्यात रेडिओग्राफी विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम एकमेव मेडिकलमध्ये आहे. येथील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी "लिनिअर एक्‍सेलॅरेटर', "सीटी सिम्युलेट नाही. ही बाब लक्षात घेत ‘कॅन्सर नियंत्रण कार्यक्रम'अंतर्गत किमान मेडिकलमधील कॅन्सर विभागाच्या नूतनीकरणासाठी २५ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला होता. यातील सहा कोटीतून "लिनिअर एक्‍सेलॅरेटर' मिळणार होते. तत्कालीन आरोग्य विभागातील सहसंचालक डॉ. जी. एच. चिंधे यांनी मेडिकलची पाहणी केली होती. परंतु हे यंत्र देखील मिळाले नाही. 

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

अत्याधुनिक उपचारासाठी मेडिकलमध्ये तयार होणारे कॅन्सर इन्स्टिट्यूट भाजप सरकारने औरंगाबाद येथे पळवले. विदर्भातील कॅन्सरग्रस्तांच्या जिवावर हे बेतत असतानाही विदर्भातील सारे लोकप्रतिनिधी कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूचा तमाशा बघत आहेत. विशेष म्हणजे मेडिकलच्या कॅन्सर विभागात एकही अद्ययावत यंत्र नाही. कालबाह्य ठरलेल्या कोबाल्टवर रेडिएशन दिले जाते.

कॅन्सर संस्था कागदावरच
योग्य उपचारानंतर ८० टक्के बालक पूर्णपणे बरे होतात. मेडिकलमध्ये कॅन्सरग्रस्तानी लढा उभारल्यानंतर कॉँग्रेस सरकारने कॅन्सर इन्स्टिट्यूटची घोषणा केली. मात्र, भाजपचे सरकार आल्यानंतर ही संस्था औरंगाबादला पळवली. केंद्रशासनाकडून ४५ कोटीची योजना मंजूर झाली ती देखील याच सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडे वळवली. यामुळे मेडिकलच्या संस्थेसाठी न्यायालयात धाव घेतली. २०१७ मध्ये न्यायालयाने १८ महिन्यांत कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारा असा निकाल दिला. मात्र, कॅन्सर संस्था कागदावरच आहे. 
- डॉ. के. एम. कांबळे,
माजी विभागप्रमुख, रेडिओथेरपी विभाग, मेडिकल

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com