
महाशिवरात्रीचा दिवस असल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजतापासूनच कामाला सुरुवात झाली. महिला मजुरांचे 10 फूट खोल खड्ड्यात उतरून कॉंक्रिटचे काम सुरू होते. काम सुरू असताना साडेसातच्या दरम्यान बंधाऱ्याचा ढिगारा खाली काम करीत असलेल्या महिलांच्या अंगावर पडला. यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या.
सावनेर (जि. नागपूर) : सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आदासा पटकाखेडी नाल्यावर सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिलांचा मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजतादरम्यान घडली.
वर्षा शामलाल मडावी (वय 26), अनुसयाबाई हरदेव टेकाम (वय 45), सुनीताबाई कैलास (वय 35) व रामप्यारी उदयसिंग काकोरिया (वय 18) सर्व रा. पांढरकवडा बरघाट, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. जखमी महिलांची नावे कळू शकली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे नागपूरच्या स्मॉल स्केल इरिगेशन कन्स्ट्रक्शन कंपनीचे आदासा पटकाखेडी मार्गावरील नाल्यावर मागील आठ-दहा दिवसांपासून बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने मध्यप्रदेश येथील शिवनी जिल्ह्यातील मजूर आणले होते. त्यात महिलाही होत्या.
बंधारा कामादरम्यान घडली घटना
महाशिवरात्रीचा दिवस असल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजतापासूनच कामाला सुरुवात झाली. महिला मजुरांचे 10 फूट खोल खड्ड्यात उतरून कॉंक्रिटचे काम सुरू होते. काम सुरू असताना साडेसातच्या दरम्यान बंधाऱ्याचा ढिगारा खाली काम करीत असलेल्या महिलांच्या अंगावर पडला. यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या.
- देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री?
मृतदेह परस्पर रवाना
मृत चार महिलांपैकी तिघींचा मृतदेह शवविच्छेदन न करता इतर मजुरांसोबत शिवनी येथील त्यांच्या गावाला पाठविण्यात आला. तर एकीचा मृतदेह सावनेर येथील आरोग्य केंद्रात दाखल करून नंतर शिवनीला रवाना करण्यात आले. जखमी तीन महिलांना उपचारासाठी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.
लपवाछपवीचा प्रयत्न
सकाळी घटना घडल्यानंतर ठेकेदाराने सावनेर पोलिसांना सूचना देण्यासाठी बराच विलंब केला. एवढी मोठी घटना घडूनही संबंधित विभागाचे अधिकारी मौन बाळगून आहेत. तर काम करत असलेल्या मजुरांची नावेही ठेकेदाराला माहीत नसल्यामुळे प्रकरणात लपवाछपवी होत असल्याचे लक्षात येते. या कामावरील अभियंत्याला सावनेर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.