बापरे ! "त्या' चौघांनी साक्षात पाहिला "मृत्यू' आणि मग घडले असे....

रामटेक: पुरात वाहून जात असलेली कार बाहेर काढताना नागरिक.
रामटेक: पुरात वाहून जात असलेली कार बाहेर काढताना नागरिक.


रामटेक (जि.नागपूर) : पुलावरून थोडेफार पाणी वाहत होते. त्यामुळे त्यांनी कार पुलावरून पुढे घेतली. कार गाडी थोडी पुढे गेली. अचानक पाण्याचा रेटा वाढला. कार पाण्यात हेलकावे खाऊ लागली. प्रसंगावधान राखून त्यांनी कारचे हॅंडब्रेक लावले. कारमध्ये पाणी शिरू लागले. कार बंद पडली. आता कसे? कारचे काच उघडण्याचा प्रयत्न सुरू झाला...मृत्यू साक्षात पुढे उभा असताना काय घडले त्यांच्यासोबत...

अचानक पाण्याची पातळी वाढली, पुढे...
सोमवार, वेळ संध्याकाळी पाच वाजताची. रामटेक येथील प्रसिद्ध औषध व्यवसायी, श्रीसमर्थ शिक्षण
मंडळाचे सहसचिव ऋषिकेश किंमतकर चिमुकल्या अभंग आणि कंत्राटदार, अभियंता संदीप महाजन यांच्यासह पारशिवनीकडून रामटेककडे येत होते. ते आमडी फाट्यापर्यंत पोहोचले. याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्र.33वर उड्डाणपूल आहे. पुलाच्या डाव्या बाजूने रामटेककडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड आहे. त्या रोडवर नाला आहे. नाल्यावर रपटा आहे. त्यावेळी पाऊस सुरू होता. त्यामुळे रपट्यावरून थोडेसे पाणी वाहत होते. आपली कार यावरून सहज निघून जाईल या विश्वासाने त्यांनी कार त्या रपट्यावरून पुढे काढण्याचा प्रयत्न केला. अचानक पाण्याची पातळी वाढली. आणि त्यांची कार तरंगायला लागली. पाण्यावर हेलकावे खाऊ लागली. आता काही खरे नाही, हे त्यांच्या ध्यानी आले. परंतु, प्रसंगावधान राखून त्यांनी कारचा हॅंडब्रेक लावला. मग त्यांनी कारचे काच खाली करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यात त्यांचे पाच-सात मिनिटे गेली. इकडे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत होती. अचानक मागील खिडकीची काच खाली आली. लगेच ऋषिकेश खिडकीतून बाहेर पडले. भीतीने थरथर कापणाऱ्या "अभंग'ला बाहेर ओढले व तिथे आलेल्या काहीजणांच्या ताब्यात त्याला दिले. आता कमरेपर्यंतचे पाणी छातीपर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत कारमध्येच बसून असलेल्या संदीप महाजन यांना त्यांनी बाहेर या, असे म्हणून त्यांना कसेतरी खिडकीतून बाहेर काढले.

आमदार आशीष जयस्वालांनी दिले आदेश
सुदैवाने बाजूलाच असलेल्या धरमकाट्यावरील "क्रेन' चालकाला विनंती करून मदतीला पोहोचलेल्या मित्र, परिचित व इतर लोकांच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. यावेळेपर्यंत न. प. विरोधी पक्षनेते सुमित कोठारी यांनी आमदार जयस्वाल यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी पारशिवनी पोलिस व तहसीलदारांना माहिती देऊन मदतकार्य राबविण्याचा आदेश दिला. तहसीलदार पोहोचले, पोलिसही पोहोचले. ऋषिकेश यांच्या पत्नी डॉ.अंशुजा किंमतकर, ऋषिकेशचे मोठे बंधू शैलेंद्र, रितेश चौकसे, निर्भय घाटोळे, नितीन चिंतलवार, बिकेंद्र महाजन आणि बरीचशी मित्रमंडळी घटनास्थळी पोहोचली होती. उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारेदेखील पोहोचले.

देवाचे मानले आभार
ऋषिकेश किंमतकर यांच्या मातोश्री कुसुमताई यांना तोपर्यंत घटनेची माहिती कळली. मुलगा आणि नातू यांच्या काळजीने त्या व्याकूळ झाल्या होत्या. थोड्या वेळाने नातू अभंग त्यांच्या कुशीत पोहोचला. थोड्या उशिराने मुलगा ऋषिकेशही घरी पोहोचला. ऋषिकेशने घरी पोहोचून वडिलांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन आणि आईच्या पायावर डोके ठेवून पुनर्जन्माबद्दल देवाचे आभार मानले.

अभंग म्हणतो, मला भीती वाटली होती
आमच्या कारने पाण्यात तरंगायला लागल्यानंतर मला भीती वाटली. मी पाण्यात गच्च ओला झालो होतो. त्यामुळे थरथर कापत होतो. बाबांनी मला खिडकीतून ओढून बाहेर काढले, तेव्हा माझी भीती कमी झाली. संदीप काका बाहेर यायला तयार नव्हते. ते हातातील टेप माझ्याकडे देत होते. मी त्यांना म्हटले, आधी जीव वाचवा, बाहेर या. तेव्हा कुठे ते बाबांच्या मदतीने खिडकीबाहेर आले.

कधी येईल प्रशासनाला जाग?
या नाल्याला आलेल्या पुरात यापूर्वी अनेकजण वाहून गेले आहेत. मागील वर्षी दुचाकीवरील दोघेजण वाहून गेले होते. त्यापूर्वी आणखी एक स्कॉर्पिओ गाडी अशीच वाहात पुलाच्या कठड्यापर्यंत गेली होती. आज ही घटना घडली. प्रशासनाने आतातरी यावर उपाययोजना करावी अन्यथा मोठी घटना घडायला वेळ लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com