दंत महाविद्यालय झाले प्रशिक्षण केंद्र, काय झाले असावे?

Fourth grade employees do all the work at dental hospital at Nagpur
Fourth grade employees do all the work at dental hospital at Nagpur

नागपूर : एखाद्या डॉक्‍टरकडे काम करताना कंपाउंडर गोळ्या देण्यापासून तर इंजेक्‍शन टोचण्यापर्यंत प्रशिक्षित होतो. त्याच धर्तीवर विदर्भात एकमेव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात "डेंचर' अर्थात कवळ्या तयार करण्याचे काम या दंत रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. येथे तंत्रज्ञ आहेत, संख्येने कमी असतील, परंतु डेंचर त्यांनीच करायचे आहे. मात्र, वर्षानुवर्षांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी "डेंचर'चे काम करताहेत. या कर्मचाऱ्यांना ना मोबदला मिळत, ना सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर पदोन्नती. तरी त्यांची सेवा कायम सुरू आहे, हे कर्मचारी डेंचरची कामे का करतात, हे प्रश्‍न आहे. 

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी, परिचर असो की सफाई कामगार किंवा शिपाई हे सारे चतुर्थश्रेणी कर्मचारी "आलराउंडर' आहेत. शासकीय दंत महाविद्यालयात दररोज चारशे ते पाचशे रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. यापैकी साठ ते सत्तर रुग्णांना "डेंचर'ची गरज भासते. प्रामुख्याने 104 क्रमांकाच्या खोलीत डेंचरचे काम चालते. 

हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी दहावी उत्तीर्ण आहेत. परंतु, त्यांच्याकडे डेंचर तयार करण्यासंदर्भात तांत्रिक प्रमाणपत्र नाही. यामुळे आयुष्यभर अकुशल कामगार म्हणूनच त्यांच्यावर ठपका राहणार आहे. मात्र, शासकीय दंत महाविद्यालयात वर्षाला 1,700 वर कवळ्या तयार होत असताना यातील हजार कवळ्या तयार करण्याचे काम हे चतुर्थ श्रेणी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गलेलठ्ठ वेतन घेणारे तंत्रज्ञ

येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या डेंचरच्या कामाचे ऑडिट केल्यास गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या तंत्रज्ञांकडून होत असलेल्या डेंचरच्या कामापेक्षा तसूभरही कमी नाही. उलट महिन्याला पन्नास हजारांपेक्षा जास्त वेतन घेणाऱ्या तंत्रज्ञांपेक्षा जास्त कवळ्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. तांत्रिक प्रशिक्षणाशिवाय डेंचर तोंडात अडकू शकते. मात्र, ही जोखीम स्वीकारत येथील विभागप्रमुख या अकुशल कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतात.

प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न 
चतुर्थ श्रेणी कर्मचारी डेंचरचे काम करतात, हे खरे आहे. परंतु, त्यांच्याकडे डेंचर तंत्रज्ञ पदासाठी आवश्‍यक शैक्षणिक अर्हता नाही. अनुभव आहे, परंतु ते अकुशलमध्ये मोडतात. यामुळे त्यांना पदोन्नती देता येत नाही. मोबदलाही देता येत नाही. परंतु, यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 
- डॉ. मंगेश फडनाईक, 
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com