एका आयफोनची किंमत चार लाख सहासष्ट हजार रुपये; उच्चशिक्षित तरुणाची अशीही फसवणूक

अनिल कांबळे
Monday, 2 November 2020

शेषनाथने ब्ल्यूटुथ बूक केले. त्यानंतर दिनेशने पुन्हा शेषनाथच्या मोबाइलवर संपर्क साधून आणखी एक उत्पादन बूक करण्यास सांगितले. शेषनाथने आयफोन बूक केला. आयफोनच्या विम्यासाठी फोन पेद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले. शेषनाथने पैसे पाठविले. त्यानंतर सतत तो पैसे पाठवत गेला. अशाप्रकारे त्याची चार लाख ६६ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

नागपूर : कमी किमतीत मिळत असलेल्या आयफोनच्या नादात युवकाने तब्बल चार लाख ६६ हजार रुपये गमावले. ही घटना एमआयडीसीतील इसासनी भागात उघडकीस आली. शेषनाथ मनी यादव (वय २५) याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेषनाथचे आयटीआय पूर्ण झाले असून, तो नोकरीच्या शोधात आहे. शेषनाथचे वडील वेकोलिचे निवृत्त अधिकारी आहे. त्यांचा व्यवहार शेषनाथ बघतो. काही दिवसांपूर्वी शेषनाथच्या मोबाइलवर दिनेश गुप्ता याने संपर्क साधला. सीटी कार्ड २४ डॉट कॉममधून बोलत आहे. या बेवसाईडवरून उत्पादन बूक केल्यास मोठी सूट मिळेल, असे आमिष त्याने दाखविले.

अधिक वाचा - कांदा, बटाटा तडकला; लाभ व्यापाऱ्यांना; शेतकऱ्यांचे माप रितेच

शेषनाथने ब्ल्यूटुथ बूक केले. त्यानंतर दिनेशने पुन्हा शेषनाथच्या मोबाइलवर संपर्क साधून आणखी एक उत्पादन बूक करण्यास सांगितले. शेषनाथने आयफोन बूक केला. आयफोनच्या विम्यासाठी फोन पेद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले. शेषनाथने पैसे पाठविले. त्यानंतर सतत तो पैसे पाठवत गेला. अशाप्रकारे त्याची चार लाख ६६ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

शेतजमिनीच्या खरेदीत ४५ लाखांनी फसवणूक

मुकेश धृवकुमार मेश्राम (वय ४०, रा. भगवाननगर, न्यू बॅनर्जी ले-आऊट, नागपूर) यांची सन २००८ मध्ये आरोपी शिवदास श्रीराम इंगळे (वय ४५, रा. न्यू सुभेदार ले-आऊट, नागपूर) यांच्याशी ओळख झाली. त्यांना मनोज नानकू यादव (वय ५५, रा. चुनाभटी, वर्धा रोड, नागपूर) हे माझ्या ओेळखीचे असून त्यांनी एमआयडीसी हद्दीतील इसासनी, हिंगणा रोड येथील शेत विक्रीसाठी असल्याचे सांगितले.

क्लिक करा - टाकू का विहिरीत उडी? असे म्हणताच गेला तोल...

मुकेश मेश्राम यांनी आरोपी शिवदास इंगळेवर विश्वास ठेवून शेतजमिनीची कागदपत्रे पाहिली आणि शेतीचा २५ लाखांत सौदा केला. त्यानंतर आरोपीने मेश्राम यांना रजिस्ट्री करून दिली. मेश्राम यांनी त्या शेतीमधील १.१६ हेक्टर हिस्सा कोणताही मोबदला न घेता आरोपी शिवदास इंगळेच्या नावाने आम मुख्त्यारपत्र करून दिले.

आरोपी इंगळेने जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून मुकेश यांची स्वाक्षरी न घेता आममुख्त्यारपत्राच्या आधारे दुरुस्तीपत्र तयार करून मेश्राम यांचा विश्वासघात करून ४५ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले.

हेही वाचा - भाजपमध्ये खळबळ; झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘काम झाले हिशेब कधी करतो’

वृद्धेची ऑनलाईन फसवणूक

एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून वृद्धेला सायबर गुन्हेगाराने एटीएमची माहिती घेऊन ५० हजारांनी ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. ज्योती रघुनाथ सराफ (७०, रा. सावरकरनगर, खामला रोड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राहुल जोशी असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ज्योती यांच्या मोबाईलवर राहुल जोशी नावाच्या आरोपीचा फोन आला. त्याने बँक ऑफ बडोदामधून बोलत असल्याची थाप मारत तेथे आपण व्यवस्थापक असल्याचे सांगितले. त्याने ज्योती यांना डेबीट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगितले. ते सुरू करण्यासाठी केवायसी करावे लागेल. त्यासाठी तुम्ही बँकेत या, असा आधी विश्वास दर्शविला. नंतर ठगबाजाने बोलण्यात गुंतवून डेबीट कार्डचा नंबर विचारला. तो सांगताच पुन्हा सीव्हीसी नंबर मागितला.

अधिक माहितीसाठी - Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा

थोड्या वेळात त्यांना ओटीपी नंबर आला. ओटीपी नंबर सांगताच ठगबाजाने ज्योती यांच्या खात्यातून दोन वेळा २५-२५ हजार रुपये अशी ५० हजारांची रक्कम ऑनलाईन काढली. ही बाब लक्षात येताच ज्योती यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with young man Four and a half lakh