#SadStory : मित्राने दगा दिला, पत्नीनेही दूर लोटले; चेन्नईचा गणेशन नागपुरात कचरा वेचून भरतोय पोट

Ganesan of Chennai is filling his stomach by selling garbage in Nagpur
Ganesan of Chennai is filling his stomach by selling garbage in Nagpur

नागपूर : कार्यालयातील सहकारी मित्राने दगा दिला. त्यानंतर पत्नीने विश्वासघात करून घर सोडण्यास भाग पाडले. मित्र व परिवाराने दूर लोटल्यानंतर तो अचानक फुटपाथवर आला. आता शहरभर कचरा वेचून पोटाची खळगी भरतो आहे. ही संघर्षमय कहाणी आहे ७९ वर्षीय गणेशन सामीची...

अस्खलित इंग्रजी बोलणारा गणेशन हा मूळचा तमिळनाडूमधील तिरूवनवेली शहराचा. जवळपास ३५ वर्षांपूर्वी बनारस येथील कंपनी बंद पडल्यानंतर तो नागपुरात आला. कोराडी पॉवरहाऊसमध्ये रोजंदारीने नोकरी करीत असताना त्याने अडचणीत सापडलेल्या एका सहकारी मित्राला मदत केली. मात्र, मित्राने त्यालाच दगा दिला. यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या गणेशनने अखेर निराशेच्या भरात नोकरीचा राजीनामा दिला.

गणेशनला पत्नी आणि एक विवाहित मुलगी आहे. शिवाय मेहनतीच्या कमाईवर बांधलेले इंदिरानगर येथे घरदेखील आहे. मात्र, पत्नीने सर्व पैसे हडपून घरावर कब्जा करून आपल्याला वाऱ्यावर सोडून दिले, असा गणेशनचा आरोप आहे. त्यामुळे एकेकाळी पुरेसे पैसे खिशात असणारा गणेशन कंगाल व निराधार झाला.

कुटुंबीयाने दूर लोटल्यानंतर गणेशनने काही दिवस भीक मागून पोट भरले. फुटपाथचं त्याचे घर बनले. मात्र, भीक मागून खाणे मनाला न पटल्याने तो जगण्यासाठी कचरा वेचू लागला. थरथरते पाय अन् पोटात भूक साठवून तो दिवसभर उन्हातान्हात पायपीट करत कचरा व रद्दी जमा करतो. जमा केलेला कचरा पाच-पन्नास रुपयांत विकून मिळेल त्या टपरीवर दोन घास खाऊन पोटाची भूक शांत करतो. सायंकाळी फुटपाथवरील झोपडीत आराम करतो.

पत्नीमुळेच माझे आयुष्य उध्वस्त झाले

गेल्या बारा-तेरा वर्षांपासून त्याचा हा नित्यक्रम सुरू आहे. गणेशनची मुलगी दिल्लीत राहते, तर जावई रेल्वेत नोकरी करतो. मात्र, स्वाभिमानी गणेशनची त्यांना त्रास देण्याची इच्छा नाही. आयुष्याचे शेवटचे दिवस फुटपाथवरचं काढणार असल्याचे त्याने सांगितले. गणेशनच्या मनात बायकोबद्दल प्रचंड राग दिसून आला. त्यामुळेच घर सोडून २८ वर्षे होऊनही तो एकदाही तिला भेटायला गेला नाही. पत्नीमुळेच माझे आयुष्य उध्वस्त झाले, अशी त्याची तक्रार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com