मोठी बातमी : एटीएम हॅकर्सच्या टोळ्या सक्रिय, विमानाने येतात; बॅंकांना चुना लावून जातात

अनिल कांबळे 
Wednesday, 23 September 2020

नवी दिल्ली, पंजाब, हरयाणा, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील सायबर गुन्हेगारांनी संपूर्ण भारतात हैदोस घातला आहे. टेक्निकल एक्सपर्ट असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर सध्या महाराष्ट्र राज्य आहे.

नागपूर : उत्तर भारतातील सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर महाराष्ट्राची उपराजधानी असून त्यांच्या टोळ्यांनी विशिष्ट बॅंकांचे एटीएमला ट्रॅप केले आहे. टेक्निकल एक्सपर्ट असलेले गुन्हेगार बॅंकेच्या एटीएममधून लाखो रुपये काढून मोठमोठ्या बॅंकांची फसवणूक करीत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली, पंजाब, हरयाणा, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील सायबर गुन्हेगारांनी संपूर्ण भारतात हैदोस घातला आहे. टेक्निकल एक्सपर्ट असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर सध्या महाराष्ट्र राज्य असून, चक्क नागपूर शहराला प्राधान्य दिले असल्याची माहिती आहे. सायबर गुन्हेगार थेट विमानाने उपराजधानी गाठतात. 

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

दिवसाला ५ ते ८ हजार रुपये भाडे असलेल्या वर्धा रोडवरील मोठमोठ्या पॉश हॉटेलमध्ये थांबतात. त्यानंतर टोळी तयार करून भाड्याने कार किंवा बाईक घेतात. संपूर्ण शहराचा ‘रेकी’ करतात. त्यानंतर त्यांच्या टार्गेटवर आलेल्या एटीएमची माहिती गोळा करतात. एटीएम हॅक करण्यासाठी लागणाऱ्या सामानाची किट त्यांच्याकडे असते. शहरातील विशिष्ट बॅंकेलाच ते चुना लावतात. आतापर्यंत शहरात एटीएम हॅक करून पैसे काढल्याच्या जवळपास १० ते १२ घटना उघडकीस आल्या आहेत.

असे काढतात लाखो रुपये

पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास एटीएममध्ये टोळी घुसते. एक जण बाहेर असतो तर दुसरा एटीएमशी छेडछाड करून पैसे काढतो. मशिनमधून एक ते दोन लाखांची रक्कम काढल्या जाते. ग्राहकांचे कोणतेही नुकसान न करता केवळ पैसे काढल्या जातात. ती सर्व रक्कम थेट बॅंकेच्या खात्यातून काढल्या जात असल्यामुळे बॅंक प्रशासनाच्या लवकर लक्षात येत नाही.

क्लिक करा - शाळा प्रवेशाचे वय शिथिल; राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आदेश, असे आहेत बदल
 

अल्पशिक्षित युवक एटीएम हॅकिंगमध्ये एक्सपर्ट

हरयाणा राज्यातील मेवात जिल्ह्यातील अनेक अल्पशिक्षित युवक बॅंक एटीएम हॅकिंगमध्ये एक्सपर्ट आहेत. ते युवक तांत्रिक ज्ञान प्राप्त करून एटीएम हॅकिंगचे प्रशिक्षण घेतात. त्यानंतर केवळ वर्षभरात बेरोजगार असलेला युवक कोट्यधीश बनतो. या काळ्या कमाईतून एक्सपर्ट युवकांनी मोठमोठे बंगले बांधतात. महागड्या स्टायलीश कार खरेदी करतात. तसेच ते विमान प्रवास आणि महागड्या हॉटेल आणि डान्सबारमधे पैसे उडवितात.

गुन्हे शाखेपुढे आव्हान

गुन्हे शाखा आणि किचकट तपासात ‘महारथ’ प्राप्त असलेल्या पोलीस निरीक्षकांसमोर एटीएम हॅकर्सच्या टोळीचे मोठे आव्हान आहे. हॅकर्सच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच ठाणेदारांना तर न सुटण्यासारखे कोडे आहे. त्यामुळे हॅकर्सच्या टोळीच्या प्रतिबंध घालणे नव्या पोलीस आयुक्तांसमोर आव्हान आहे. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangs of ATM hackers active in Nagpur