व्वारे प्रशासन ! अगोदर केले खोलीकरण, नंतर काढल्या निवीदा, मग केली सारवासारव...

टाकळघाट  :  नदीवर करण्याचे आलेले पात्र खोलीकरणाचे काम.
टाकळघाट : नदीवर करण्याचे आलेले पात्र खोलीकरणाचे काम.

टाकळघाट (जि.नागपूर)  : पावसाळ्यात येणाऱ्या पावसामुळे नदी नाल्याला येणाऱ्या पुराच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता सन 2020-21मध्ये ग्रामपंचायत टाकळघाट अंतर्गत येथील कृष्णा नदीचे खोलीकरण करण्यात आले. परंतू मासिक सभा किंवा ग्रामसभेत कुठल्याही प्रकारची मंजुरी घेतली नसून ग्रामपंचायतीच्या सन2020"21 च्या अंदाजपत्रकात तरतूद नाही. कामाचे प्राकलन घेण्यात आले नसून कुठल्याही वर्तमानपत्रात निविदाही प्रसिद्ध केली नाही. तसेच या कामाची तांत्रिक मंजुरी न घेताच ग्रामपंचायतीने नदीचे खोलीकरण केले असल्याचे दिसून येते. नदीच्या खोलिकरणाचे काम सुरु झाल्यानंतर प्राकलन आल्याची माहिती पुढे येत आहे.

कुणालाच विश्‍वासात घेतले नाही
टाकळघाट येथील कृष्णा नदीला दरवर्षी पूर येतो. या धोक्‍याची दखल घेत ग्रामपंचायतीने नदीचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार ते खोलीकरण गावानजीकच्या नदी काठावर करायचे होते. परंतू ग्रामपंचायत सदस्याला खुश करण्यासाठी पुराचे पाणी शेतात जाऊन पिकाची नासधूस होऊ नये, म्हणून गावाच्या बाहेरील आमघाट परिसरात जवळपास500 ते700 मीटर लांब नदीचे खोलीकरण करण्यात आले. कामाचे अंदाजपत्रक, प्राकलन, निविदा व मासिक सभा किंवा ग्रामसभेत मंजुरी न घेताच सरपंच व ग्रामसेवकाने मर्जीतील कंत्राटदाराला कामाचे कंत्राट देऊन लाखो रुपयांचे काम करून घेतल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. शेवटी काम सुरु झाल्यावर प्राकलन आल्याची माहिती मिळते. म्हणजेच प्राकलनास सर्व सदस्यांची मंजूरी न घेताच काम करून घेतले.
महत्वाची बाब अशी की, शासकीय कामाची निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना सबब कामाची निविदा न देता आपल्या मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठीच संबंधित खोलीकरनाचे काम सरपंचाने शोधून काढले असल्याचे दिसून येते.

सचिव व सरपंचावर कारवाईची मागणी
गावातील लोकांच्या हिताकरिता व गावाच्या सुरक्षिततेकरिता येणाऱ्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यास सज्ज असणे ही स्थानिक प्रशासनाची जवाबदारी जरी असली तरी सबब खोलीकरणाचा ठराव कुठल्या महिन्याच्या मासिक सभेत घेतला, संबधीत कामाचे प्राकलन, त्यास मंजूरी कधी, अंदाजपत्रक किती, या संबधित कामाच्या निविदा कुठे, कंत्राटदार कोण, इत्यादी प्रश्न गुलदस्त्यातच आहेत.

सरपंच निरूत्तर, सचिव करतात सारवासारव
विशेष महत्वाचे म्हणजे संबधित कामासंदर्भात ग्रामविकास अधिकारी संदीप उमाटे यांच्याशी संपर्क साधला असता या कामाचे प्राकलन आले असून निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. तर सरपंच शारदा शिंगारे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कोणतेही उत्तर मिळाले नाही. याचाच अर्थ संबंधित काम सरपंच व सचिव यांच्या संगनामताने झाले की अन्य कुणाच्या, असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. त्यानुसार या खोलीकरणाबाबत सबंधित अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com