जुना वाद विसरून भाच्याच्या लग्न सोहळ्यात सहभागी झाली मामी; हाच निर्णय पडला महागात

gold necklace was snatched at niece's wedding
gold necklace was snatched at niece's wedding

नागपूर : जुना वाद विसरून भाच्याच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जाणे मामीला चांगलेच महागात पडले. लग्नसोहळ्यातच घरगुती वाद उफाळून आला. लग्नसोहळ्यात सहभागी नातेवाइकांनी एकत्र येत शस्‍त्राच्या धाकावर मामीच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार हिसकावून नेला. याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सुनील लहरिया, सौरभ लहरिया, अतुल लहरिया, अशोक लहरिया, किशोर लहरिया, अनिकेत लहरिया, धनराज लहरिया, अजय ऊर्फ कैलास लहरिया व एक अनोळखी व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत. श्री इंद्रायणी, इंद्रप्रस्थ ले-आउट, स्वावलंबीनगर मागे राहणारा प्रतीक शर्मा (२९) याच्या मामाचा मुलगा केदार लहिरया याचे २८ नोव्हेंबरला लग्न होते.

लहरिया व शर्मा यांच्यात जुना वाद आहे. तो विसरून प्रतिक आपल्या आईला घेऊन या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेला. पण, त्यामुळे वाद निर्माण झाला. लहरिया कुटुंबीयांकडून त्यांना विरोध करण्यात आला.आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून प्रतिकच्या आईच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार हिसकावून घेतला. याप्रकरणी प्रतिकच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिकांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे. 

साडीच्या मोहात गमावले दागिने

जुनी मंगळवारी येथील रहिवासी अंजनाबाई पराते (६२) या नेहमीप्रमाणे आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारात कामावर जाण्यासाठी घरून निघाल्या. महालातील व्यास गल्ली येथे एका अनोळखी ठगबाजाने त्यांना थांबविले. समोर साडी वाटप सुरू असून माझ्यासोबत चला मी मिळवून देतो, अशी बतावणी केली. गर्दी असल्याने दागिने काढून ठेवण्याची सूचना केली. त्याच्यावर विश्वास ठेवून अंजनाबाई यांनी कानातील सोन्याचे कर्णफूल आणि गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवले. काही कळण्यापूर्वीच ठगबाज पिशवी घेऊन पळून गेला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गायत्री सेल्समधील चोरीचा पर्दाफाश

लकडगंज हद्दीतील काब्रा पेट्रोल पंपासमोरील गायत्री सेल्समधील चोरीचा पर्दाफाश करण्यात लकडगंज पोलिसांना यश आहे आहे. पोलिसांनी चोरट्याला अटक करीत चोरलेला २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बंटी ऊर्फ माऊझर मिश्रा (२१) रा. माटे चौकाजवळ, गरोबा मैदान असे चोरट्याचे नाव आहे. गायत्री सेल्स मधीर चोरीची घटना २५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला होता. गुप्त माहितीवरून माऊझरला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबूली दिली. त्याच्याकजून चोरून नेलेले गव्हाच्या पोत्यांसह २६ हजाराचे विविध साहित्य जप्त करण्यात आले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com