मार्चमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका? सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

नीलेश डोये
Tuesday, 1 December 2020

कोरोनाच्या सावटात देशातील अनेक राज्यात निवडणुका पार पडत आहेत. विधान परिषदेकरिताही निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नागपूर : कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे सहा-आठ महिन्यांपासून प्रशासकाची नियुक्ती आहे. सरकार आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या तयारीत आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १२ डिसेंबरपूर्वी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन केले. त्यामुळे ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पुढे ढकलण्यात आलेल्या संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतीवर प्रशासकाची पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने गावातील मतदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून बराच वादंग झाला.

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने शासनाचा निर्णय अयोग्य ठरविला. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक पदावर वर्णी लावण्यात आली. कायद्यानुसार प्रशासकाची नियुक्ती सहा महिन्यांसाठीच असते. परंतु, कोरोनाची अनिश्चितता पाहता कायद्यात सुधार करून ही मर्यादा अनिश्चित काळासाठी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यासाठी कायद्यात सुधारणा करून अध्यादेशही काढण्यात आला.

कोरोनाच्या सावटात देशातील अनेक राज्यात निवडणुका पार पडत आहेत. विधान परिषदेकरिताही निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा - बाबांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ. शीतल आमटेंचा दफनविधी, रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार

जिल्ह्यात ७६८ ग्रामपंचायती

नागपूर जिल्ह्यातील ७६८ ग्रामपंचायतींमधील सरपंचाची आरक्षण सोडत काढायची आहे. तर १३० ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी (एक डिसेंबर) प्रसिद्ध होणार असून १० डिसेंबरला अंतिम प्रभागर चना प्रसिद्ध होईल. 

अशी असेल सरपंच सोडत

  • ३८६ महिला 
  • १३१ एस.सी. 
  • ६६ एस.सी.महिला 
  • ९९ एस.टी. 
  • ५० एस.टी. महिला 
  • २०७ ओबीसी 
  • १०४ ओबीसी महिला 
  • ३३१ खुला प्रवर्ग 
  • १६६ खुला प्रवर्ग महिला

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat elections in March