
कायदा रद्द होईस्तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे.
नागपूर : राजधानी दिल्लीच्या सिमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने मंगळवारी भारत बंदची हाक दिली. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. नागपुरात सकाळपासून दुकाने बंद आहेत. बरेचसे मोठे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. सक्करदरा, ऑटोमोटीव्ह चौक आणि शहरातील इतर भागांत कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी शांततेने मोर्चे काढून दुकानदारांना आणि नागरिकांना बंदचे आवाहन केले. मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अमरावती : बंददरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता. शिवाय रस्त्यानेही ये-जा करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बऱ्यापैकी बंद होती. दरम्यान, शहरातील राजकमल चौक येथे सर्वपक्षीय नेत्यांनी नारेबाजी करीत शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावे, अशी मागणी केली. तर ग्रामीण भागातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, वरुड, मोर्शी, अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी, दर्यापूर आदी तालुक्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अधिक वाचा - सुका मेव्यापेक्षा फायदेशीर गूळ-फुटाणे, फायदे वाचून व्हाल चकित
यवतमाळ : बसस्थानक चौकात विविध संघटनांनी निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याला यवतमाळ जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
कायदा रद्द होईस्तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत हे आंदोलन सुरु असून कुठे चांगला तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
चंद्रपूर : भारत बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील दुकाने, बाजारपेठ बंद करण्यात आली होती. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. शहरात सकाळी प्रमुख मार्गाने काँग्रेसचा मोर्चा निघाला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारचा निषेध करीत मोर्चा प्रमुख मार्गाने निघाला.
शेतकरीविरोधी कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढली. दुचाकी रॅली प्रमुख मार्गाने निघाली. यात शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बंदला पाठींबा दिला होता. स्थानिक जनता कॉलेज चौकात अकरा वाजता निदर्शने केली. घोषणा दिल्या.
जाणून घ्या - ऐकावे ते नवलच! खोदकाम बोरवेलचे अन् पाणी निघाले विहिरीतून
यावेळी गर्दी जमल्याने काही वेळेसाठी रस्ता जाम झाला होता. कृषीप्रधान देशात शेतकरी विरोधी कायदे होऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले आहे.
संपादन - नीलेश डाखोरे