तब्बल आठ महिन्यानंतर उघडली जिमची दारे; पहिल्या दिवशी कमी प्रतिसाद

नरेंद्र चोरे
Monday, 26 October 2020

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी 'सोशल डिस्टंसिंग'च्या अटींवर परवानगी दिल्यानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर बहुतांश जिम सुरू झालेत. पहिल्या दिवशी बोटावर मोजण्याइतक्याच फिटनेस इच्छुकांनी जिममध्ये हजेरी लावली.

नागपूर : लॉकडाउनमुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व ग्रामीण भागातील जिम, फिटनेस क्लब व व्यायामशाळा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाल्या. मात्र, पहिल्या दिवशी नागपूरकरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जिम मालकांमध्ये थोडी निराशाही दिसून आली. 

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी 'सोशल डिस्टंसिंग'च्या अटींवर परवानगी दिल्यानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर बहुतांश जिम सुरू झालेत. पहिल्या दिवशी बोटावर मोजण्याइतक्याच फिटनेस इच्छुकांनी जिममध्ये हजेरी लावली. मात्र, हिवाळा सुरू झाल्याने हळूहळू नागपूरकर गर्दी करतील, अशी आशा माधवनगर येथील 'एक्‍स्ट्रा एज फिटनेस'चे संचालक व राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू कुणाल वाचनेकर यांनी व्यक्त केली. उशिरा का होईना जिमला परवानगी बहाल केल्याबद्दल त्यांनी सरकारला धन्यवाद दिले. त्यामुळे लॉकडाउनकाळात झालेले आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, असे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे सध्या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी, कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे येत्या काळात जिममध्ये गर्दी वाढणार असल्याचे सांगून, सरकारच्या निर्देशानुसार आम्ही नियमित सॅनिटायझेशन, मास्क, 'सोशल डिस्टंसिंग' इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

हेही वाचा - निधीअभावी सहा महिन्यांपासून अनेकांचे घरकुल बांधकाम अर्धवट, लाभार्थ्यांचा मोडक्या घरात संसार

कुणाल यांनी लाखो रुपये खर्च करून गेल्या फेब्रुवारीमध्ये जिम सुरू केली होती. मात्र, व्यवसायाची गाडी रुळावर येण्यापूर्वीच महिनाभरात त्यांना जिम बंद करावी लागली. कोरोनाचा व्यवसायावर खूप परिणाम झाला. तसेच प्रचंड आर्थिक नुकसान झाले, असेही त्यांनी सांगितले. शहरात आजच्या घडीला पाचशेच्या वर छोटेमोठे जिम व फिटनेस क्‍लब आहेत. कोरोनामुळे त्या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला. केवळ जिम मालकच नव्हे, त्यावर उदरनिर्वाह असलेले प्रशिक्षक (ट्रेनर) व अन्य कर्मचारीही बेरोजगार झाले होते. 

हेही वाचा - `दीक्षा`तून घरोघरी पोहोचतो बाबासाहेबांचा विचार;...

'मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यापासून खूपच कठीण दिवस गेलेत. या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता जिमला परवानगी मिळाल्याने हळूहळू गाडी रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे.' 
-कुणाल वाचनेकर, संचालक, एक्‍स्ट्रा एज फिटनेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gym are open after eight months in nagpur