हार्दिक पांड्या म्हणाला, देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानास्पद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

लहानपणी जेव्हा सर्वप्रथम हातात बॅट घेतली होती, तेव्हा देशाकडून खेळण्याची माझी मनापासून इच्छा होती. सुदैवाने माझे हे स्वप्न लवकरच पूर्ण झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे, ही माझ्यासाठी आनंद व अभिमानाची बाब असल्याची भावना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने तिसऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलून दाखविली.

नागपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील विविध मैदानांवर सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा शुक्रवारी यशवंत स्टेडियमवर थाटात समारोप झाला. याप्रसंगी अनुजाने घेतलेल्या छोटेखानी मुलाखतीदरम्यान हार्दिक म्हणाला, माझा खेळ पाहून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी माझ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचे भाकीत वर्तविले होते.

पण, त्यासाठी मला शिस्त आणि क्रिकेटप्रती प्रामाणिक राहण्याचा त्यांनी सल्ला दिला होता. त्यांचे हे प्रेरणादायी शब्द माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. त्यांच्यामुळेच मी देशाकडून खेळू शकलो. यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.

जास्तीतजास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा

हार्दिकने त्याच्या यशात कुटुंबीयांचा मोठा वाटा असल्याचे सांगून, भारतीय संघात स्थान मिळविणे सोपे, पण ते स्थान टिकवून ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागत असल्याचे त्याने सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या युवा खेळाडूंसाठी सुरू केलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाची स्तुती करीत, या संधीचा जास्तीतजास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असेही तो यावेळी म्हणाला.

व्यासपीठावर दिग्गजांची उपस्थिती

व्यासपीठावर नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर संदीप जोशी, प्रेसिडेंट ग्रुपचे मनोज चुग, महिंद्रा नागपूरचे प्लांट हेड श्रीकांत दुबे, शैलेंद्र मिश्रा, माजी खासदार अजय संचेती, आमदार विकास कुंभारे, प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, मोहन मते, सुधाकर कोहळे, मोहन मते, विकास कुंभारे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

शेकडो खेळाडूंना व्यासपीठ मिळाले : नितीन गडकरी

गडकरी यांनी आपल्या भाषणात महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल खेळाडूंचे आभार व अभिनंदन व्यक्‍त केले. ते म्हणाले, ज्या उद्देशाने आम्ही हा महोत्सव सुरू केला होता, तो यशस्वी ठरतो आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने शेकडो खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले. हार्दिकसारख्या खेळाडूंपासून त्यांना प्रेरणा मिळून नागपूर शहरातून भविष्यात शेकडो हार्दिक पांड्या तयार होतील, अशी आशा व्यक्‍त केली.

पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद दिल्याबद्दल खेळाडूंना धन्यवाद देत, खेलो इंडिया महोत्सवात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अव्वल स्थान पटकाविल्याबद्दल पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. महापौर संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

भाऊ काणे यांचा "क्रीडा महर्षी'ने सत्कार

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते प्रशिक्षक भाऊ काणे यांचा क्रीडा महर्षी पुरस्काराने सत्कार करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्ह व रोख पाच लाख रुपये देण्यात आले. याशिवाय अन्य 30 खेळाडूंना क्रीडाभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीडाभूषण विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्यात आले. समारोप समारंभानंतर प्रसिद्ध गायक झुबिन नौटियालच्या "लाइव्ह कॉन्सर्ट'ने नागपूरकरांचे मनोरंजन केले.
 

क्रीडाभूषण विजेते खेळाडू

आदित्य सरवटे, भारती फुलमाळी, गुरुदास राऊत (तिघेही क्रिकेट) निकिता राऊत (ऍथलेटिक्‍स), श्रेया दांडेकर (बास्केटबॉल), अल्फिया पठाण (मुष्टियुद्ध), संकल्प गुप्ता (बुद्धिबळ), धनश्री लेकुरवाळे (योगासन), ऋतुजा तळेगावकर (जलतरण), वैष्णवी भाले (बॅडमिंटन), भाग्यश्री धार्मिक (व्हॉलीबॉल), चेतन महाडिक (सॉफ्टबॉल), कौस्तुभ उदार (टेबलटेनिस), शाकिब रहिम (हॉकी), पूजा चिदान (सायकलिंग), किसन तिवारी (शरीरसौष्ठव), वासू कनोजिया (फुटबॉल), गुरुचरण तांबे (कॅरम), पृथ्वीराज शेळके (तायक्‍वांदो), हर्षद झाडे (रायफल शूटिंग), स्वाती सातार (खा-खो), पंकज बेंद्रे (टेनिस), केविन अतकर (ज्युदो), शाहनवाझ खान (कबड्‌डी), निनाद दीक्षित (मल्लखांब), प्राची पारसी, मृण्मयी वालदे, आयुषी घोडेस्वार (जिम्नॅस्टिक्‍स), महेश काळे (कुस्ती), मोनाली जाधव (तिरंदाजी), हर्षदा दमकोंडवार (तलवालरबाजी), पामिर सहारे (सेपाक टॅकरॉ).

क्लिक करा : वाघाच्या दर्शनासाठी जंगलात गेला 'देव'

समारोप समारंभाची क्षणचित्रे

- खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी जवळपास 20 ते 30 हजार क्रीडाप्रेमींनी यशवंत स्टेडियमवर हजेरी लावली. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते.
- समारंभाचे आकर्षण असलेल्या हार्दिक पांड्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करून नागपूरकर चाहत्यांची मने जिंकली. स्वत: गडकरी, फडणवीस व बावनकुळे यांनी हार्दिकला गोलंदाजी केली.
- हार्दिकने यावेळी लहान मुलांसोबत"रॅम्प वॉक' करून आपल्यातील अष्टपैलूत्व सिद्ध केले. शिवाय त्याने "बाला डान्स'वर धमाल नृत्यदेखील केले.
- समारोपप्रसंगी प्रसिद्ध गायक झुबिन नौटियालच्या "लाइव्ह कॉन्सर्ट'ने नागपूरकरांचे मनोरंजन केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardy Pandya said in nagpur, proud to represent the country