आजही मुसळधारेचा इशारा. वरुणराजाने नागपूरकरांची उडविली झोप...

heavy rain in nagpur.
heavy rain in nagpur.

नागपूर : रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर वरुणराजाने पुन्हा उशीरा रात्री दणका देत नागपूरकरांची झोप उडविली. जोरदार पावसामुळे झोपडपट्ट्यांसह अनेक वस्त्यांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना चांगलाच फटका बसला.

नागपुरात काल यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी ११७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारीही विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात दिसून येत आहे. रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने दाणादाण उडविल्यानंतर उशीरा रात्रीही विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार सरी बरसल्या. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत सुरूच होता. अवघ्या पाच ते सहा तासांत तब्बल ११७.१ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात बारा तासांतील हा विक्रम ठरला. यापूर्वी १४ जुलैच्या रात्री १०० मिलिमीटर पाऊस बरसला होता. उल्लेखनीय म्हणजे शहरात आतापर्यंत ७९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

अनेक वस्त्या पाण्यात 
पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले. ठिकठिकाणी पाणी शिरल्याच्या तसेच तलाव साचल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे आल्या. पावसाचा सर्वाधिक फटका झोपडपट्टी व खोलगट भागांना बसला. येथील नागरिकांना रात्र जागवून काढावी लागली. हुडकेश्वर परिसरातील रस्त्यावर पाणी तुंबल्याने चक्क नाव चालल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे नाग व पिवळ्या नदीसह छोटेमोठे नाले दुथडी भरून वाहिले. अंबाझरी तलावही तुडुंब भरल्याने पुन्हा ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला. शहरातील रेशीमबाग, कस्तुरचंद पार्कसह अनेक मैदानांवर पाणीच पाणी दिसत होते. 

कुठे गुडघाभर, तर कुठे कंबरेपर्यंत पाणी 
पावसामुळे शहरातील रस्ते व चौकही जलमय झाले होते. कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी साचले होते. नरेंद्रनगर व लोखंडी पूलासह सीताबर्डी, महाल, मेडीकल चौक, सक्‍करदरा, बेसा, मनीषनगर, मानेवाडा, इतवारी, दिघोरी, सदर, काटोल रोड, झिंगाबाई टाकळी, कामठी, गड्‌डीगोदाम, जरीपटका, दाभा, त्रिमुर्तीनगर, पडोळे चौक, छत्रपती चौकाला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने वाहनधारकांना त्रास झाला नाही. 

आजही मुसळधारेचा इशारा 
हवामान विभागाने उद्या, मंगळवारीही विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. विशेषत: नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात गडचिरोली (५५ मिलिमीटर) व वर्धा (४५.६ मिलिमीटर) येथेही दमदार पाऊस बरसला. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com