भूमाफियांची आता खैर नाही! गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक; सोमवारपासून करणार निपटारा  

अनिल कांबळे 
Saturday, 17 October 2020

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संकल्पनेतून गेल्या २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान रवीभवनातील शिबिर कार्यालयात गुंड व भूमाफीयांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला होता

नागपूर ः शहरातील भूमाफियांच्या विरोधात गृहमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतला आहे. भूखंडाच्या खरेदी-विक्रीत झालेल्या फसवणुकीसंदर्भात तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यापैकी ५० तक्रारींचा निपटारा सोमवारी (ता.१९) पोलिस जिमखाना येथे खुद्द गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह संबंधित पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संकल्पनेतून गेल्या २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान रवीभवनातील शिबिर कार्यालयात गुंड व भूमाफीयांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला होता. यात नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. 

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

या काळात ३०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी पहिल्या ५० तक्रारींवर सुनावणी येत्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सिव्हिल लाइनमधील पोलिस जिमखाना कार्यालयात होणार आहे. गृहविभागातर्फे तक्रारकर्त्यांना सूचना देण्यात येणार आहेत. गृहविभागाकडून सूचना मिळालेल्या तक्रारकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

उर्वरित तक्रारदारांची सुनावणी पुढील टप्प्यात होणार आहे. तक्रारकर्त्यांना बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई व्हावी, यासाठी पहिल्या ५० तक्रारदारांना बोलविण्यात येणार आहे. तक्रार निवारण कक्षाला मिळालेल्या सर्व तक्रारींची सुनावणी टप्याटप्प्याने होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीसाठी संबंधित निबंधक रजिस्ट्रार यांनाही हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला 

थेट कारवाई करणार 

गुंड व भूमाफीयांच्या दहशतीमुळे शहरातील सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यावर आळा घालण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यानुसार आता पोलिस थेट कारवाई करण्यास सुरुवात करणार आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home minister Anil deshmukh will take action against Land mafia