Video : आम्ही कॉंग्रेस सरकारसारखे नाही, भूमिपूजन करतो आणि उदघाटन सुद्धा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

फायर ब्रिगेड व एनडीआरएफ हे उपेक्षित क्षेत्र राहिले. कुणीही याकडे फारसे लक्ष दिले नाही. पंतप्रधान मोदी यांनी त्यास गती देण्याचे काम केले. याचा फायदा होताना दिसत आहे. चक्रीवादळ, त्सुनामीची वेळीच माहिती मिळत असून, आवश्‍यक उपाययोजनाही होत आहेत. 1999 ला ओडिशात आलेल्या चक्रीवादळात 10 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही वर्षांत तीन चक्रीवादळे आली. यात 66 लोकांचाच मृत्यू झाला. हा आकडा जास्त असला, तरी तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे.

नागपूर : कॉंग्रेस सरकारच्या वेळी भूमिपूजन एकाच्या कार्यकाळात, काम दुसऱ्या, पैसा तिसऱ्या तर लोकार्पण चौथ्या सरकारच्या काळात होत होते. मात्र, मोदी सरकारच्या वेळी भूमिपूजन आणि लोकार्पण एकाच कार्यकाळात होत आहेत, असे  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अभिमानाने सांगितले.  फायर ब्रिगेड हा राज्याचा विषय असून, त्यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे याची जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला आधुनिक रूप देण्याचे काम केले आहे. या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाचा वापर संपूर्ण राज्यांनी करावा. फायर ब्रिगेड हे संपूर्ण सेवा बनायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

राजनगर येथे राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महानिदेशक एम. नागेश्‍वर राव, संयुक्त सचिव संजीवकुमार जिंदल, एस. एन. प्रधान उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले की, फायर ब्रिगेड व एनडीआरएफ हे उपेक्षित क्षेत्र राहिले. कुणीही याकडे फारसे लक्ष दिले नाही. पंतप्रधान मोदी यांनी त्यास गती देण्याचे काम केले. याचा फायदा होताना दिसत आहे. चक्रीवादळ, त्सुनामीची वेळीच माहिती मिळत असून, आवश्‍यक उपाययोजनाही होत आहेत. 1999 ला ओडिशात आलेल्या चक्रीवादळात 10 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही वर्षांत तीन चक्रीवादळे आली. यात 66 लोकांचाच मृत्यू झाला. हा आकडा जास्त असला, तरी तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. या विभागात करण्यात आलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्‍य झाले आहे. फायर ब्रिगेड राज्याच्या अधिकाराचा भाग आहे. मात्र, त्यांनी फारसे काही केले नाही. या महाविद्यालयाचा सर्वांनी उपयोग करायला पाहिजे. सार्क देशांमध्येही हे महाविद्यालय विशेष स्थान प्राप्त करेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा - झिंगलेली तरुणी पोहोचली ठाण्यात, सांगितले हे कारण...

एनडीआरएफच्या इमारतीचे भूमिपूजन, फायर कॉलेजचे लोकार्पण
शहर आणि ग्रामीण भागाचा विकास करताना आगीच्या घटनांत वाढ होते. अशा वेळी या विभागाचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले. खासगी संस्था व कंपनी यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे. आपत्तीच्या वेळी या यंत्रांच्या वापराचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहराज्यमंत्री राय आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक नागेश्‍वर यांनी केले. आभार जी. एस. सैनी यांनी मानले.

आंतरिक, बाह्य सुरक्षा महत्त्वाची
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जवान नागरिकांचे संरक्षण करतात. त्यांच्या मालमत्तेची सुरक्षाही महत्त्वाची आहे. ही संपूर्ण जबाबदारी या विभागावर आहे. यासाठी नवीन, अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. आंतरिक आणि बाह्य सुरक्षेसोबत नागरिकांच्या जिवाची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

क्लिक करा - गोड बातमी आली, नागपुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोनशे बाळांचा जन्म

शौर्यपदकांचे वितरण
या वेळी अग्निशमन सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले. अब्दुल माजिद वाणी, रवींद्र कुमार, राज कुमार, मनोहर लाल, पुरण सिंह, राजन, मनप्रीत सिंह, सुखदेव सिंह यांना मरणोपरान्त पुरस्कार मिळाला. त्यांच्या नातेवाइकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच हजुरा सिंह, नरेश कुमार, लवलेश सूद, सुदागर सिंह, गुलाम हसन वाणी, बशीर अहमद खान, गुलाम हसन भट्ट, गुलाम हसन लोन, परवेज अहमद वाणी, अमन शर्मा, अजित सिंह, जितेंद्र कुमार, धर्मेंद्र मिश्रा, लोटन राम, सूर्यप्रताप सिंह, राकेश तिवारी, प्रमोद भोंडे, इंद्रजित सिंह व उमापती दंडापती यांनाही शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home minister targeted congress party at nagpur