नागपुरातून शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार; अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची घोषणा

नरेंद्र चोरे 
Thursday, 31 December 2020

कृषी कायदे केवळ कार्पोरेट व भांडवलदारांच्या हिताचे असल्यामुळे किसान सभेचा त्यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे सरकारने तिन्ही कायदे रद्द करावे, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावे तसेच हमी भावाचा कायदा करावा, अशा आमच्या मागण्या आहेत.

नागपूर : केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कायदे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून, त्याविरोधात दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी येत्या तीन जानेवारीला नागपुरातून शेकडोंच्या संख्येने कूच करणार असल्याची माहिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे संयोजक अरुण वनकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा - चंद्रपुरातील घुग्गुसचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार; नगर परिषद स्थापन करण्याची मागणी;...

वनकर म्हणाले, कृषी कायदे केवळ कार्पोरेट व भांडवलदारांच्या हिताचे असल्यामुळे किसान सभेचा त्यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे सरकारने तिन्ही कायदे रद्द करावे, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावे तसेच हमी भावाचा कायदा करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समितीतर्फे एक जानेवारीला नागपूरसह संपूर्ण भारतात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन तसेच भीमा कोरेगाव विजयाचा शौर्यदिन साजरा केला जणार आहे. नागपुरात संविधान चौकात दुपारी तीन वाजता वाचन होणार आहे. 

याशिवाय दोन जानेवारीला कॉ. ए. बी. बर्धन यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त भाकपच्या आयटक कार्यालयात डॉ. गौतम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी तीन वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर तीन जानेवारीला सायंकाळी राज्यभरातून नागपुरात आलेले शेतकरी किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे यांच्या नेतृत्वात कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नक्की वाचा - रेल्वे कर्मचाऱ्यानं केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत कारवाई; नागपूर जिल्ह्यातील...

शहाजापूर (राजस्थान) सीमेकडे रवाना होण्यापूर्वी संविधान चौकात विशाल जाहीर सभा होणार आहे. या सभेला स्वामिनाथन आयोगाचे सदस्य अतुलकुमार अनजान संबोधित करणार असल्याची माहिती वनकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य डॉ. युगल रायलू, संजय राऊत व रवी पराते उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of Farmers will join protest in delhi from Nagpur said Arun Wankar