
नियमांचे उल्लंघन करत अवैध वृक्षतोड करीत असल्याचा आरोप वाईल्डलाईफ कांजर्वेशन अँड डेव्हलपमेंटच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
उमरेड (जि. नागपूर) : कऱ्हांडला अभयारण्याच्या हद्दीलगतच नागपूर-उमरेड- नागभीड ब्रॉड गेजचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी अभयारण्याच्या हद्दीतील वृक्ष रेल्वे प्रशासन, कंत्राटदार व संबंधीत विभागाचे वन अधिकारी हे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करत अवैध वृक्षतोड करीत असल्याचा आरोप वाईल्डलाईफ कांजर्वेशन अँड डेव्हलपमेंटच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
वृक्षतोडीस कारणीभूत असलेले अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अमोल खोबरागडे, सचिव रोहित कारू यांच्या नेतृत्वात मिलिंद वाघमारे, हरीश आटे, निखिल कातोरे, मयूर वाघमारे, राकेश रोहनकर, हेमंत पाटील, गौरव सोनडवले यांनी केली आहे.
कंपार्टमेंट नंबर १४३९ मध्ये होणारी अवैध वृक्षतोड कंपार्टमेंट वाईल्डलाइफच्या हद्दीत होत आहे. इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमाप्रमाणे वृक्षतोड किंवा रस्त्याचे व इतर डेव्हलपमेंटचे काम करण्याकरिता स्टेट वाइल्डलाइफ बोर्ड व केंद्र शासनाची परवानगी लागते. पण ही वृक्षतोड वाइल्डलाइफ डिपार्टमेंटला पूर्वसूचना न देता करण्यात आलेली आहे. सगळ्या कामाची परवानगी दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राधिकारी, प्रादेशिक वन विभाग नागपूर यांनी दिलेली आहे. पण उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या हद्दीत हे काम झाले असल्यामुळे त्यांना न विचारता ते पूर्ण करण्यात आले आहे.
जंगल हा खूप महत्त्वाचा वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्ग आहे. अशा ठिकाणी काहीही करण्याकरिता वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग कुठेही खंडित होता कामा नये. परवानगी नसताना तिथे पुलाचे काम सुद्धा सुरू झालेले आहे. हे काम तात्काळ थांबविण्यात यावे व दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. अभयारण्याची निर्मिती होऊन आठ वर्ष होऊनसुद्धा ‘बॉण्ड्री डिमार्केशन’चे काम झालेले नाही आणि याचाच फायदा घेऊन असामाजिक तत्त्व अवैध कामाला लागले आहेत.
हे चाललेले अवैध काम तात्काळ थांबविण्यात यावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून वन्यप्राण्यांचे रक्षण आणि जंगल संवर्धन होईल. पुढील सात दिवसात दोषींवर कारवाई झाली नाही तर संघटन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक वाचा - बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण
२८ तारखेला आमची प्राथमिक पाहणी झाली. त्यात वनसंरक्षक , वन्यजीव विभाग अधिकारी तथा रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये १४३९ कंपार्टमेंट नंबर आहे. रेल्वेच्या दुसऱ्या बाजूचा भाग हासुद्धा वन्यजीव विभागाच्या हद्दीत असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले आहे. समितीच्या निदर्शनास आणून दिले होते. त्या अनुषंगाने उपवनसंरक्षक आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी वजा पडताळणी सुरू आहे.
राहुल गवई
विभागीय वन अधिकारी
उमरेड कऱ्हाडला ,वन्यजीव विभाग
संपादन - अथर्व महांकाळ