सिंजर ते अंबाडा रस्त्यावर दोन महिन्यांपासून अवैध वृक्षतोड, वनविभागाचे दुर्लक्ष

विजयकुमार राऊत
Thursday, 15 October 2020

वृक्षतोडीबाबत नागरिकांनी संबंधित वनविभागाला कळवले असूनसुद्धा कसलीही कारवाई वनविभागाकडून केली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या आशीर्वादाने हा वृक्षतोडीचा प्रकार चालू असल्याची चर्चा आहे.

अंबाडा (जि. नागपूर): जामगाव-सिंजर-थडीपवनी-अंबाडा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून या मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. परंतु, मागील २ महिन्यांपासून या मार्गावरील झाडे अज्ञात व्यक्ती रात्रीच्या सुमारास कापून नेत आहे. मात्र, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.

वृक्षतोडीबाबत नागरिकांनी संबंधित वनविभागाला कळवले असूनसुद्धा कसलीही कारवाई वनविभागाकडून केली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या आशीर्वादाने हा वृक्षतोडीचा प्रकार चालू असल्याची चर्चा आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे दरवर्षी शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. वृक्ष लागवडीला दरवर्षी करोडो रुपये शासनाकडून खर्च केले जातात. परंतु, हा खर्च व्यर्थ जात असल्याचे दिसून येत आहे. जामगाव-सिंजर-थंडीपवनी-अंबाडा या मार्गावरील शेकडो झाडांची कत्तल करून चोरून नेली जात आहेत. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 

हेही वाचा - वाघाच्या हल्ल्यामुळे चंद्रपुरात शेकडो महिला विधवा, शासन योजनांच्या लाभापासून वंचित

वृक्ष तोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चाललेले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस शेकडो वृक्षांची कत्तल करून लाकडं चोरून नेणाऱ्या अज्ञांतांनावर कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. येथे 

मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा खेळ सुरू आहे व कधी थांबेल? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. हा प्रकार मागील २ महिन्यांपासून सुरू असल्याबाबतची माहिती नागरिकांनी दिली असून संबंधित विभागाने मंगळवारला (दि. १३) याची दखल घेत जलालखेडा पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून त्या व्यक्तीचा तसेच लाकडांची वाहतूक होत असलेल्या वाहनाचा शोध घेणे सुरू आहे.  

हेही वाचा - निराधारांना तीन महिन्यांपासून 'आधार'च नाही, निधी अडकल्यानं उपासमारीची वेळ

वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई करा -

रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठमोठ्या कडूलिंबाच्या व बाभळीच्या झाडांची कत्तल केली जात आहे. याबाबत त्या लोकांना विचारणा केली असता आम्ही संबंधित विभागाची परवानगी घेतली आहे, असे उत्तर त्या वृक्षतोड करणाऱ्याने दिले. परंतु, असे असते तर ती झाडे रात्रीच्या वेळेस का कापली असती? त्यामुळे याबाबत संबंधित विभागाला माहिती दिली असून विभागाने तातडीने वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तींनवर कारवाई करावी.

 - इरेश सावरकर, सरपंच, दावसा 

जलालखेडा पोलीस ठाण्यात तक्रार -
सिंजर-थडीपवनी-अंबाडा या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाची कत्तल करून लाकूड चोरून नेत असल्याची माहिती मंगळवारी मिळाली. त्या भागाची पाहणी करून याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस ठाणे जलालखेडा येथे तक्रार दाखल केली आहे. 

संजू भोजने, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal tree cutting at jinjer to ambada road in nagpur