Inauguration of the Orange City International Film Festival
Inauguration of the Orange City International Film Festival

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन

नागपूर : डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा होता. जैत रे जैत, सिंहासन, सामना व उंबरठा या चार चित्रपटांच्या सीडी मी सातत्याने सोबत बाळगायचो. सिंहासन यशस्वी झाला, कारण त्यात दाखविण्यात आलेली राजकीय स्थिती प्रेक्षकांना आवडली. वर्तमान राजकीय स्थितीचे डॉ. जब्बार पटेलांनी त्याचवेळी भाकित केले होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केले.

महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने होणाऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गुरुवारी उद्‌घाटन झाले. याप्रसंगी भांडारकर बोलत होते. कार्यक्रमाला ऍनिमेशन चित्रपट गुरू आशिष कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बाल पटेल, महापौर संदीप जोशी, विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, फाऊंडेशनचे सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम, समर नखाते, विशाल शिंदे, सुक्रांत सेन, लेखक गणेश देसाई, मिलिंद उके, आदिती अक्कलकोटकर, हेडी एमरी, ईश्वरी येंडे व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी मधुर भांडारकर व आशिष कुलकर्णी यांना ओसिफ पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक लोक आजही चित्रपट आनंदी होण्यासाठी बघतात. काही चित्रपट अतिशय कमी खर्चात तयार होत असून, फेस्टिवलच्या माध्यमातून अशाच चित्रपटांचा परिचय होत असल्याचे भांडारकर म्हणाले.
मराठी माणसाने सुरू केलेले चित्रपट महोत्सव सुरूवातीला उत्साहाने होतात, पण त्यानंतर उत्साह ओसरत जातो. अशा स्थितीत डॉ. चंद्रकांत मेश्राम यांच्यासारखा रसिक चित्रपट महोत्सवांची धुरा सांभाळतो ही आनंदाची बाब असल्याचे म्हणत जब्बार पटेल यांनी डॉ. मेश्राम यांचे कौतुक केले.
मी धरमपेठेत लहानाचा मोठा झालो. चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनासाठी धरमपेठेत आलो ही या जागेची पुण्याई आहे असे आशिष कुळकर्णी म्हणाले. ऍनिमेशन जगतात प्रत्येक जण सिनेसृष्टीत काम करण्यासाठी येतो. मात्र दूर्देवाने हे क्षेत्र केवळ बाल मनोरंजनात अडकले असल्याचे कुळकर्णी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व संचालन सुधीर भावे यांनी केले तर आभार उदय गुप्ते यांनी मानले.

असा होईल महोत्सव

यंदा हा महोत्सव इंदोरा येथील आयनॉक्‍स जसवंत तुली मॉल येथे दाखविण्यात येणार आहे. चित्रपटांशिवाय 38 लघुपटांचाही आनंद रसिकांना लुटता येईल. 9 फेब्रुवारीपर्यंत आयोजित महोत्सवात 7 फेब्रुवारीला सकाळी 9.30 वाजता पहिला चित्रपट दाखविला जाईल. त्यानंतर तीन दिवस नागपूरकरांना मराठी, हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, हंगेरी, मेक्‍सिको चित्रपट बघता येतील. शिवाय काही चित्रपटांपूर्वी त्यातील कलाकार रसिकांना संवाद साधतील.

पालकमंत्र्यांची दांडी?

महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर शहराचे पालकमंत्री म्हणून डॉ. नितीन राऊत यांची घोषणा झाली. मात्र त्यानंतर होणाऱ्या अनेक कार्यक्रमांच्या पत्रिकेवर डॉ. राऊत यांचे नाव नमूद असले तरी त्यांचे प्रत्यक्ष उपस्थिती मात्र नसते. पालकमंत्री झाल्यानंतर महापालिकेच्या एकाही कार्यक्रमात ते दिसले नसून, महापालिकेने आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाच्या उद्गाटन सोहळ्यालाही ते उपस्थित नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com