The incidence of dementia is higher in women
The incidence of dementia is higher in women

जागतिक अल्झायमर दिन : महिलांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण अधिक

नागपूर : बाळंतपण, पाळी, ताणतणाव, स्पर्धा यासारख्या बाबींमुळे महिलांमध्येही ताण वाढत आहे. उतारवयात त्याचे परिणाम दिसू लागतात. स्मृतिभ्रंश हा त्यातील एक आजार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या स्मृतिभ्रंशाची जोखीम दीडपट अधिक असते. देशात प्रत्येक एक हजार नागरिकांमध्ये चौघांना स्मृतिभ्रंश (अल्झायमर) आजार होतो. येत्या दहा वर्षांत हे प्रमाण दुपटीने वाढण्याची शक्यता आहे, असे मेंदूरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे.

स्मृती आणि मेंदूचा अत्यंत जवळचा संबंध असल्याचे नमूद करीत प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले की, स्मृतिभ्रंशाचे अचूक कारण अद्याप स्पष्ट नाही. जगात सुमारे पाच कोटी रुग्ण आहेत. या आजारात मेंदूच्या पेशी खराब होतात. महत्त्वाच्या तारखा, घटना विसरणे, घराचा मार्ग विसरणे, वाचनाची अडचण, नातेवाईक आणि मित्रांना न ओळखणे, नातेसंबंध विसरणे आदी लक्षणे आहेत.

इंडियन ॲकेडमी ऑफ न्यूरोलॉजी, नागपूर न्यूरोलॉजी सोसायटी, सायकायट्री सोसायटी (नागपूर), ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन आणि सप्तक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अल्झायमर दिनाचे निमित्त साधून सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता एका आभासी बैठकीचे आयोजन केले आहे. स्मृती कशी टिकवायची, या विषयावर मुंबईचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. सरोश कात्रक विचार व्यक्त करतील. मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे अल्झायमरच्या विविध लक्षणांची माहिती देतील.

अभिनेत्री अमृता सुभाष आणि त्यांची आई ज्योती सुभाष स्मृतिभ्रंशातील अनुभव कथन करणार आहेत. अल्झायमर अँड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडियाच्या महासचिव विद्या शेनॉय पर्यावरण आणि स्मृतिभ्रंशावर विचार व्यक्त करतील. डॉ. सुधीर भावे संचालन करणार आहेत, असे कार्यक्रमाचे संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले. नागरिकांना www.streamtech.in/Alzheimersdaypap-Pramirol या लिंकवर जाऊन संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमात सहभागी होता येईल.

स्मृतिभ्रंश औषधांद्वारे बरा होऊ शकतो
वाढत्या वयानुसार काही प्रमाणात स्मृती कमी होणे अपेक्षित आहे. परंतु, ते अल्झायमरच असेल असे नाही. स्मृतिभ्रंशाला मेंदूच्या लहान रक्तवाहिन्या बंद होणेही जबाबदार असू शकते. या आजारावर सध्या कोणतीही औषध नाही. पण काही औषधांनी आजारवाढीवर नियंत्रणाचा प्रयत्न करता येते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे, हायपोथायरॉइडीझममुळे स्मृतिभ्रंश झाल्यास तो औषधांद्वारे बरा होऊ शकतो.
- डॉ. चंद्रशेखर मेश्राम,
मेंदूरोगतज्ज्ञ, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com