महिलांनो सावधान! आता तुम्ही आहात चोरांचे टार्गेट; रस्त्याने चालताना आपल्या मौल्यवान वस्तूंकडे ठेवा लक्ष

अनिल कांबळे  
Sunday, 18 October 2020

शहरात चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या असून शहरभर चेनस्नॅचिंग आणि लुटमार करीत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या टोळ्या महिलांना टार्गेट करीत आहे.

नागपूर ः गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मारामारीच्या आणि खुनाच्या घटनांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तसंच पोलिस विभाग सतर्क आहे. मात्र आता चोरीच्या घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हे चोर प्रामुख्याने महिलांना लुटत आहेत. त्यामुळे आता शहरात फिरताना महिलांना अति सावध राहण्याची गरज आहे.  

शहरात चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या असून शहरभर चेनस्नॅचिंग आणि लुटमार करीत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या टोळ्या महिलांना टार्गेट करीत आहे. अशाच दोन घटना यशोधरानगर आणि हुडकेश्वर परिसरात घडल्या असून एका महिल्याच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले तर दुतऱ्या महिलेचा मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावली.  

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत यशोधरानगर हद्दीतील नामदेव नगर येथे राहणाऱ्या मिरा प्रदीप वैरागडे (४०) या शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दुकानासमोर उभ्या होत्या. दरम्यान अंदाजे २० ते २५ वर्ष वयोगटातील एक अनोळखी आरोपी मिरा यांच्या जवळ आला. 

त्याने तुमच्या दुकानात खर्रा मिळतो का? असे विचारून मिरा यांच्या गळ्यावर थाप मारली. गळ्यातील ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. हाकेच्या अंतरावर त्याचा दुसरा साथीदार दुचाकी घेऊन उभा होता. आरोपी त्याच्या गाडीवर बसून फरार झाला.

सविस्तर वाचा - लग्नास नकार दिल्याने घरमालकाकडून भाडेकरू शिक्षिकेला मारहाण, गुन्हा दाखल

तसेच दुसऱ्या घटनेत सोनाली मयुर मस्के (२७) रा. जुनी वस्ती, दिघोरी या शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास मोबाईलवर बोलत पायी जात होत्या. दरम्यान हुडकेश्वर हद्दीतील आदर्श कॉलनी, सर्वश्रीनगर येथे दोन अनोळखी आरोपी दुचाकीवर आले. दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपीने सोनाली यांचा मोबाईल आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या दोन्ही घटनेत संबंधित पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून लुटारुंचा शोध सुरू केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: incidents of chain snatching are increasing in Nagpur