विद्यार्थ्यांनो, शाळा-महाविद्यालयात येऊ नका! संस्थांचे तोंडी आदेश; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

institution order to not attend school college due to corona cases increases in nagpur
institution order to not attend school college due to corona cases increases in nagpur

नागपूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शाळांनी खबरदारी म्हणून इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत न येता ऑनलाइन वर्गांचे तोंडी आदेश दिले आहेत. दुसरीकडे महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना केवळ प्रात्यक्षिकांसाठीच महाविद्यालयात येण्याच्या सूचना केल्या आहेत. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. शाळा सुरू आणि महाविद्यालय बंद का, या प्रश्नामुळे १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. मात्र, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी येत नसल्याचे चित्र आहे. याउलट, ग्रामीण भागातील महाविद्यालयातील उपस्थिती समाधानकारक आहे. शहरात आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही शाळांनी आता तोंडी सूचना देत विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाइन वर्ग घेण्याचे सांगितले आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक असल्यास पूर्ण शाळाच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांनीही खबरदारी म्हणून आता तोंडी सूचना देत आपला मोर्चा पुन्हा ऑनलाइन वर्गांकडे वळवला आहे. 

विद्यापीठाच्या आदेशात अस्पष्टता - 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्याच्या सूचना देताना नियमांमध्ये अस्पष्टता दिसून येत आहे. या प्रकाराने विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयेही गोंधळलेली आहेत. एकीकडे महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी महापालिका आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुसरीकडे काही विभाग हे विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी अहवाल आणला तरच प्रवेश दिला जाईल, अशी ताकीद देत आहेत. तर काही विभागांनी विद्यार्थ्यांना कोरोनासंदर्भात कुठल्याही सूचनाही दिलेल्या नाहीत. विद्यापीठाच्या आदेशात अस्पष्टता असल्याने गोंधळलेले विद्यार्थी महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडे भटकताना दिसत नसल्याचे चित्र आहे. 

मग शाळा-महाविद्यालयात हजारो चालतात का? 
महापालिका आयुक्तांनी शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांवर निर्बंध घालण्याचे ठरविले. त्यासाठी लग्नसमारंभातील गर्दी टाळण्याच्या उद्देशाने केवळ १०० जणांना परवानगी देण्याचा नियम करण्यात आला. मात्र, शाळा आणि महाविद्यालयात दररोज हजारावर मुले दररोज येत असतात. तेव्हा या माध्यमातून सामुदायिक प्रसाराची शक्यता नाकारता येत नाही. सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे इतर शहरांनी काळजी म्हणून शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महाविद्यालये आणि शाळेत मोठ्या संख्येत असलेली उपस्थिती कशी काय ठेवावी, याकडे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com